२००६ मध्ये प्रदर्शिद झालेला शाहिद कपूर व अमृता राव यांचा ‘विवाह’ हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. एकीकडे बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसणाऱ्या अभिनेत्रींची रेलचेल असताना राजश्री प्रॉडक्शन्सचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी ‘विवाह’सारख्या चित्रपटातून सोज्वळ, प्रेमळ, नितीमूल्ये जपणाऱ्या, कुटुंबाच्या मर्यादा पाळणाऱ्या मुलीची भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली. चित्रपटात पूनम या तरुणीची भूमिका अभिनेत्री अमृता रावने साकारली होती. या चित्रपटाला नुकतीच १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृताला एक परीक्षा द्यावी लागली होती.

‘विवाह’साठी कास्टिंग सुरु असताना एके दिवशी सकाळी वृत्तपत्रांमध्ये अमृताने वाचलं की, यावेळी राजश्री प्रॉडक्शन्सच्या चित्रपटात सलमान खान नाही तर शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यावेळी तिने तिच्या मॅनेजरला फोन करून चित्रपटाच्या भूमिकेसाठी विचारावं का असा प्रश्न विचारला. त्यावर आधीच त्यांनी सूरज बडजात्या यांची अपॉईंटमेंट घेतल्याचं सांगितलं. जेव्हा अमृता त्यांना भेटायला गेली तेव्हा सूरज बडजात्या यांच्यासोबत त्यांचे वडीलसुद्धा होते. त्यांनी अमृताला मुंशी प्रेमचंद यांची कादंबरी वाचायली दिली. अमृता हिंदी किती शुद्ध आणि स्पष्ट उच्चारू शकते हे त्यांना तपासायचं होतं.

जवळपास चार तास त्यांची ही मिटींग चालली आणि त्यानंतर पूनमच्या भूमिकेसाठी अमृताची निवड झाली. शाहिद आणि अमृताच्या जोडीला आणि दोघांच्या अभिनयाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप वाहवा मिळाली होती.