News Flash

सेलिब्रिटी लेखक : करिअरचा श्रीगणेशा बाप्पानेच!

आई-बाबांच्या या नकारामुळे आम्ही थोडय़ा नाराज झालो.

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर

सगळीकडे गणेशोत्सव जल्लोषात सुरू आहे. गणेशोत्सव..! माझा सगळ्यात आवडता सण. त्यामागेही एक कारण आहे. माझ्या लहानपणीची त्याबद्दलची एक आठवण मी कधीच विसरू शकत नाही. आज मी जी आहे, ज्या क्षेत्रात काम करत आहे, ती माझ्या लहानपणीच्या एका प्रसंगामुळे. मी लहान असताना आम्ही काही वर्षांसाठी पुण्यात राहायला आलो. आतासारखाच गणेशोत्सवाचाच काळ होता तो. आता मी गणेशोत्सव म्हटलंय खरं, पण तेव्हा मला त्याची काहीच कल्पना नव्हती. ज्या कॉलनीत आम्ही राहायला गेलो होतो तिथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होतं. तिथली गणपतीची मूर्ती भव्य होती. तिथेच माझा बाप्पा मला पहिल्यांदा भेटला. आता पुणे म्हणजे प्रत्येकाच्या घरात गणपती हे काही वेगळं सांगायला नकोच! आमच्या घरात मात्र तेव्हा गणपती येत नव्हता. कॉलनीतला, आजूबाजूचा गणेशोत्सवाचा उत्साह बघून मला आमच्या घरातही गणपती असावा असं वाटू लागलं. तो आनंद मलाही माझ्या घरात अनुभवायचा होता. त्यामुळे मी आई-बाबांकडे ‘आपल्या घरीसुद्धा गणपती आणा’ असा हट्ट केला. पण काही केल्या आई-बाबांनी ऐकलंच नाही. गणपतीचं खूप करावं लागतं. त्यात आम्ही दोघी बहिणी. त्यामुळे त्याचं नंतर कोण करेल, या विचाराने आई-बाबांनी त्यासाठी नकार दिला.

आई-बाबांच्या या नकारामुळे आम्ही थोडय़ा नाराज झालो. पण त्यानंतर आम्ही दोघींनी कॉलनीतल्या बाप्पांकडे मोर्चा वळवला. सकाळ-संध्याकाळ न चुकता आरतीला जाणं, वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेणं असं सगळं आम्ही करू लागलो. गणेशोत्सवाचा आनंद आम्ही तिथे अनुभवला. एवढंच काय तर माझ्या आयुष्यातला पहिलावहिला स्टेज परफॉर्मन्स मी तिथेच दिला. लाकडी स्टेज, त्यावर अंथरलेली लाल सतरंजी आणि माधुरी दीक्षितचा ‘अखियाँ मिलाओ कभी अखियाँ चुराओ’ या गाण्यावरचा नाच हे सगळं आजही मला तसंच्या तसं स्पष्ट आठवतं. काय मजा आली होती तेव्हा! माझा हा नाच बघून तिथल्या प्रेक्षकांनी माझं केलेलं भरभरून कौतुकही मला आज आठवतं. सगळे मला एमडी.. एमडी असं म्हणू लागले. सुरुवातीला मला काही कळतच नव्हतं. कॉलनीतले लोक माझ्या आई-बाबांना म्हणायचे की, तुमची मुलगी एकदम माधुरी दीक्षितसारखी नाचते. माझ्या नाचाचं कौतुक ते माझ्या आई-बाबांजवळ करायचे. ऐकून फार बरं वाटायचं. मला चांगलं नाचता येतं हे माझ्याआधी बाहेरच्यांना आणि नंतर घरातल्यांना कळलं.

वाचा : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन

नेहमी शांत, लाजून, मुरडून असणाऱ्या मला त्या वेळेस इतकी हिंमत कुठून आली माहीत नाही. कदाचित मला ती हिंमत बाप्पानेच दिली असेल. शाळा, कॉलेजांमध्ये असे परफॉर्मन्स मी अगदी कमीच केले. पण कॉलनीत सगळ्यात पहिल्यांदा केलेला नाच ते आजपर्यंत मला सतत वाटतं की माझा बाप्पा सतत माझ्यामागेच आहे. या संपूर्ण प्रवासात मला हे जाणवलं की दरवेळेस देवळात जाऊनच देवाचं दर्शन मिळेल असं काही नाही. देव तुम्हाला कधी कोणत्या रूपात भेटेल काही सांगता येत नाही. माझ्या करिअरचा श्रीगणेशा तर बाप्पानेच केला. त्यात पुढे जाताना मला साथही त्यानेच दिली. जेव्हा जेव्हा मी पडले तेव्हा तेव्हा त्याने मला उठण्याचं बळ दिलं. जेव्हा जेव्हा मी थांबले तेव्हा तेव्हा त्याने मला पुन्हा नव्याने सुरुवात कर असं सांगितलं. त्याच्या साथीनेच माझा हा प्रवास अजूनही चालूच आहे.

लहानपणी बाप्पाला घरी आणण्याची माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही; पण लग्नानंतर सासरी माझ्या नवऱ्याने माझी ही इच्छा पूर्ण केली आणि बाप्पा माझ्या घरी आला. ‘त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव’, हे शब्द मला सकारात्मकतेने बघायला शिकवतात. माझा बाप्पा मला एक वेगळीच ऊर्जा देतो. आज मागे वळून बघताना मला खूप छान वाटतं. जर आम्ही पुण्याला राहायला आलो नसतो तर कदाचित मला बाप्पाची इतकी ओढ लागलीच नसती. एवढय़ा सगळ्या प्रवासातून मला फक्त एवढंच कळतं, की आपण आपलं काम नेहमी प्रामाणिकपणे करत राहायचं, बाकी सगळं त्याच्यावर सोपवायचं!

वाचा : ‘सुबोधसोबतचा मुंबई टू गोवा प्रवास अविस्मरणीय’

गणेशोत्सवाने मला खूप काही दिलं. दरवर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खासच असतो. यंदाचाही आहेच. या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना मोदकभर शुभेच्छा!

अमृता खानविलकर – @AmrutaOfficial

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 9:18 am

Web Title: amruta khanvilkar celebrity writer lokprabha
Next Stories
1 Ganesh Utsav 2017 PHOTO : शाहरुखने असे केले गणरायाचे विसर्जन
2 ‘सुबोधसोबतचा मुंबई टू गोवा प्रवास अविस्मरणीय’
3 चित्ररंजन : आता मनोरंजनाचा पाऊस
Just Now!
X