कादंबरीवरून रुपेरी पडद्यावर उतरणारे चित्रपट फार थोडे असतात. त्यातही भवतालाचे बारीक निरीक्षण करून तपशीलवार लिहिलेल्या दर्जेदार कादंबऱ्या आणि त्याचे रुपेरी पडद्यावरचे रूपांतरण या दोन्हींचा मेळ साधणं हे आव्हान असल्याने त्यातून जन्माला आलेली अप्रतिम कलाकृती पाहण्याची संधीही रसिकांच्या वाटय़ाला तशी कमीच येते. कलाकार म्हणून अशाप्रकारच्या सकस लेखन असलेल्या कादंबरीतील व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवण्याचं भाग्यही फार कमी जणांच्या वाटय़ाला येतं. दिवंगत पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘झिपऱ्या’ कादंबरीतील लीला रंगवायची संधी अभिनेत्री अमृता सुभाषला मिळाली. २२ जूनला ‘झिपऱ्या’ चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने बोलताना पूर्वीचे साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांची अभिजातता, कालप्रवाहातील बदल पचवतही त्या त्या काळालाही धरून असलेल्या या कथांचा विचार करताना समाजमाध्यमांमुळे लोकांना तुकडय़ा तुकडय़ांत व्यक्त होण्याची सवय जडली आहे, अशी खंत अमृताने व्यक्त केली.

‘आजच्या काळात लोकांची व्यक्त होण्याची पद्धत बदलली आहे आणि तोच बदल त्यांच्या लेखनातही उतरला आहे. पूर्वीच्या काळी जगण्याची लय ही आजच्याइतकी धकाधकीची नव्हती. त्यामुळे त्यावेळी साहित्यिकांच्या लेखनातही ती लय सहजपणे सापडते. आत्ताच्या काळात बरेच साहित्यिक हे ब्लॅक ह्य़ुमरच्या शैलीत लिहितात. असं लिखाण याआधी मी भाऊ पाध्येंच्या कांदबरीतून कधीतरी वाचलं होतं. पण आत्ताचे लेखक खूप वेगळ्या पद्धतीने लिहितात. मला स्वत:ला सचिन कुंडलकरची ‘कोबाल्ट ब्ल्यू’ आवडते. त्यामुळे लेखन, अभिव्यक्तीची माध्यमं ही काळानुसार प्रचंड बदललेली आहेत, मात्र या पाश्र्वभूमीवर मला साधूंचं अप्रपू वाटतं,’ असं अमृता सांगते. ‘झिपऱ्या’ या कादंबरीत अरुण साधू यांनी रेल्वे फलाटावर बूटपॉलिश करत आयुष्य काढणाऱ्या मुलांची कथा रंगवली आहे. यातला नायक झिपऱ्या आणि त्याची बहीण लीला यांचं जग साधूंनी इतक्या सखोल रंगवलं आहे की जणू ते त्यांच्याबरोबर तिथे राहिले असावेत. त्यांनी ते जगणं त्यांच्याबरोबर अनुभवून कथेत उतरवलं असावं इतकं तपशिलात ते रंगवलेलं आहे. असं सांगतानाच हे शक्य झालं कारण आपले विचार मुरवत नेण्याची, अनुभवांतून मांडण्याची ताकद त्या लेखकांकडे होती, असं विश्लेषणही अमृता करते. सध्या फेसबुकमुळे आपल्याला चटकन व्यक्त होण्याची सवय लागली आहे. एखादा विचार मुरण्याआधीच तो व्यक्त करायची घाई केली जाते. अनेकदा असं घाईघाईत व्यक्त होणं हे तुकडय़ातुकडय़ांतून येतं. लगेच व्यक्त होण्याची सवय वाईट आहे असं म्हणायचं नाही मात्र त्याआधी तो विचार, तो अनुभव किमान स्वत:त मुरवायला हवा.. असं ती आग्रहाने सांगते.

कादंबरीतून जेव्हा पात्रं रुपेरी पडद्यावर रंगवायची असतात तेव्हा त्याची आव्हानं निराळी असतात. इथे साधूंची पात्रं लिखाणातच इतकी सशक्त आहेत की त्यांना तुम्ही कोणत्याच साच्यात बसवू शकत नाहीत, असं अमृताने सांगितलं. झिपऱ्याच्या बहिणीच्या लीलाच्या भूमिकेमुळे अमृता सुभाष आणि सोज्वळ अभिनेत्री हे समीकरणच मोडून पडणार आहे, असं ती गमतीने म्हणते. या चित्रपटाच्या निमित्ताने झोपडपट्टीत राहणाऱ्यांची भाषा, त्यांचं बिनधास्त जगणं आणि परिस्थितीमुळे तिथल्या स्त्रियांची हरेक व्यक्तीशी जुळवून घेत व्यक्त होण्याची पद्धत हे सारं लीलाच्या माध्यमातून अनुभवता आलं, रंगवता आलं, असं ती सांगते. त्याचं उदाहरणही ती देते. इथे आपल्याकडे टक लावून बघणाऱ्या पानवाल्याला लीला दूं क्या एक खीचके.. म्हणत धमकी देते. मात्र हीच लीला जेव्हा उस्ताद तिच्या अंगाशी झटतो तेव्हा त्याला थोडी लगट करू देते कारण आपला भाऊ उस्तादकडे कामाला आहे, याची जाणीव तिला आहे. लीलाचं झिपऱ्याशी, त्याचा मित्र नाऱ्याशी, उस्तादशी प्रत्येकाशी वेगळं नातं आहे. नाऱ्या हा लहान आहे पण तो लीलाकडे पाहतो तेव्हा तो झिपऱ्याला न घाबरता तुझी बहीण किती चिकनी आहे.. म्हणून मोकळा होतो. हा मोकळेपणा आपल्या पांढरपेशी, मध्यमवर्गीय मानसिकतेला रुचणारा नाही, मात्र त्यांच्या आजूबाजूचं आयुष्यच तसं असल्याने हे सगळं लेखकाने ज्या पद्धतीने रंगवलं आहे त्याच पद्धतीने करणं हे आव्हान होतं, असं सांगत हे आव्हान पेलणं शक्य झालं ते दिग्दर्शक केदार वैद्यमुळे असं अमृता म्हणते. कादंबरीचा अवाका हा मोठा असतो. त्याचं चित्रपटात रूपांतर करताना त्याचा आत्मा हरवणार नाही मात्र आजच्या जगण्याची लय त्यात असेल हे भान दिग्दर्शकाने जपलं असल्याचं तिने सांगितलं. अरुण साधूंनी या कादंबरीचे हक्क आजवर कोणालाच दिले नव्हते. त्यांनी स्वत: मुलाखतीत सांगितलं होतं की केदारला या कादंबरीचा आत्मा गवसला आहे पण काळानुसार कादंबरीत बदल करण्याची परवानगी देण्याइतका मोकळेपणाही साधूंकडे होता, हेही तिने आवर्जून नमूद केलं.

‘झिपऱ्या’ हा चित्रपट खऱ्याखुऱ्या झोपडपट्टी, रेल्वेफलाट अशा ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष अशा ठिकाणी चित्रण करणं हे आव्हान होतं, मात्र निर्माता रणजित दरेकर आणि अश्विनी दरेकर यांच्यामुळे तेही शक्य झाल्याचं तिने सांगितलं. या कादंबरीतील वास्तव या ठिकाणी चित्रीकरण करताना जास्त अनुभवता आलं आणि अनेकदा आपण विमनस्क झालो असा अनुभवही तिने सांगितला. ‘भिवंडीच्या एका झोपडपट्टीत चित्रीकरण सुरू होतं. आपला भाऊ वाममार्गाला जातो आहे याची जाणीव होताच चिडलेली लीला त्याला सगळ्यांसमोर मारत असते, तू जर असा वागलास तर रोज एक लगीन होणार माझं.. असा संवाद तिच्या तोंडी आहे. चित्रीकरण सुरू होण्याआधी तिथे आजूबाजूच्या बायकाही जमा झाल्या होत्या. सुरुवातीला त्यांना हसू येत होतं की, ही आपल्यासारखीच पोराला मारतेय. पण जसजसे माझ्या तोंडचे संवाद बाहेर पडत गेले तसतशा त्या गंभीर झाल्या. चित्रीकरण पूर्ण झालं तेव्हा त्यांच्या नजरा रडवेल्या झाल्या होत्या. त्यांची बदललेली नजर खूप काही सांगून गेली. ही साधूंच्या लेखनातली ताक द होती, केदारने लिहिलेल्या संवादांची आणि त्याच्या दिग्दर्शनाची ताकद होती, असं अमृताने सांगितलं.

एक अभिनेत्री म्हणून भूमिकांच्या बाबतीत आपले लाड सुरू असल्याचं ती मिश्किलपणे सांगते. तुझ्यासाठी ना अशाप्रकारची व्यक्तिरेखा देऊयात.. असं सांगत वेगळ्या भूमिका, चित्रपट माझ्यापर्यंत येऊन पोहोचतायेत, असं तिने सांगितलं. ‘परिणती’ नावाचा तिचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात तिने अल्कोहोलिक बाईची व्यक्तिरेखा साकारली आहे. मी सध्या खूप नवीन तरुण दिग्दर्शकांबरोबर काम करते आहे. अक्षय बाळसराफ हा ‘परिणती’चा दिग्दर्शक आहे. याआधी मी अविनाश अरुण बरोबर काम केलं होतं. मला या तरुण मुलांचं कौतुक वाटतं की ते वास्तव विषय मांडायला अजिबात कचरत नाहीत. एक मद्यधुंद मुलगी ही मराठी चित्रपटाची प्रमुख नायिका कशी असू शकेल? असा प्रश्न मी अक्षयला केला होता. तो मात्र जे आहे ते आहे, ते तसंच पडद्यावर येणार यावर ठाम होता. या चित्रपटात अमृता पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीबरोबर काम करते आहे. ‘नटरंग’सारख्या चित्रपटांमधून आपण सोनालीचं नृत्यकौशल्य पाहिलंय. या चित्रपटात मी सोनालीबरोबर नृत्य केलं आहे. मी इतक्या वर्षांत पहिल्यांदा या गाण्यासाठी फुलवा खामकरकडे नृत्य शिकले. बऱ्याच वर्षांनी मी नवं काही करतानाची भीती अनुभवली आणि शिकणं हे कुठल्याच वयाच्या टप्प्यावर थांबत नाही हा अनुभव घेतला, असं ती सांगते. ‘झिपऱ्या’नंतर अमृता झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’मध्येही दिसणार आहे. शिवाय, नेटफ्लिक्सच्या एका वेबसीरिजमध्येही ती काम करत असून सुमित्रा भावेंच्या आगामी चित्रपटातही ती दिसणार आहे.

सध्या फेसबुकमुळे आपल्याला चटकन व्यक्त होण्याची सवय लागली आहे. एखादा विचार मुरण्याआधीच तो व्यक्त करायची घाई केली जाते. अनेकदा असं घाईघाईत व्यक्त होणं हे तुकडय़ातुकडय़ांतून येतं. लगेच व्यक्त होण्याची सवय वाईट आहे असं म्हणायचं नाही मात्र त्याआधी तो विचार, तो अनुभव किमान स्वत:त मुरवायला हवा..

अमृता सुभाष