मराठी रंगभूमीवर एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्यांची तसेच नकलाकारांची मोठी परंपरा आहे. यात सदानंद जोशी, वि. र. गोडे, रणजित बुधकर, लक्ष्मण देशपांडे आणि अनेकांचा समावेश आहे. ही परंपरा मुंबईतील सुरेश परांजपे यांनी पुढे सुरु ठेवली आहे. परांजपे हे गेली ३७ वर्षे ‘नट-नाटक’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाचा ६०० वा प्रयोग नुकताच दादर सार्वजनिक वाचनालयात पार पडला आणि ६२५ वा प्रयोग ५ जून रोजी बोरिवली येथे होणार आहे. परांजपे यांच्या या एकपात्री प्रयोगाचे वैशिष्टय़ म्हणजे मराठी रंगभूमीवर लोकप्रिय झालेल्या नाटय़कृतींचे कथानक ते सारांशरूपात वीस मिनिटांत त्या त्या नाटकातील त्या त्या कलाकाराच्या आवाजात सादर करतात.
‘नट-नाटक’ या एकपात्री कार्यक्रमात मी ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘लहानपण देगा देवा’, ‘सूर राहू दे’ , ‘अपराध मीच केला’, ‘तो मी नव्हेच’ आणि ‘असा मी असा मी’ या लोकप्रिय नाटकांचा सारांश ते वीस मिनिटांमध्ये सादर करतात. दोन किंवा तीन अंकांचे नाटक सारांशरूपात आणि त्या त्या अभिनेत्यांच्या आवाजात नाटकातील संवाद व प्रवेश सादर करणे हे परांजपे यांच्या प्रयोगाचे वेगळेपण आहे. या प्रयोगात ते बाळ कोल्हटकर, सतीश दुभाषी, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू यांच्या आवाजात आपले सादरीकरण करतात. परांजपे यांच्या या आगळ्या प्रयोगाची दखल ‘अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदे’ने घेतली. २०१४ मध्ये नाटय़ परिषदेतर्फे दिवंगत ‘कमलाकर वैशंपायन स्मृती पारितोषिक’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सुहासिनी मुळगावकर या पूर्वी ‘संगीत सौभद्र’ हे गद्य नाटक एकपात्री स्वरूपात सादर करीत होत्या. त्यानंतर गद्य नाटकांच्या सादरीकरणाचा असा प्रयोग करणारे परांजपे हे एकमेव कलाकार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, मा. दत्ताराम आदी मान्यवरांनीही परांजपे यांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात गद्य नाटकांवर आधारित आपला हा प्रयोग वेगळा असून प्रयोग पाहण्यासाठी येणाऱ्या जुन्या पिढीतील प्रेक्षकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो तर नव्या पिढीला त्या नाटकाची आणि त्यात काम करीत असलेल्या दिग्गज अभिनेत्यांची अभिनय शैली पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या विविध भागांत तसेच महाराष्ट्राबाहेरही आपण याचे प्रयोग केले असल्याचे परांजपे यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले.

Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट