स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी भुकेलेल्यांच्या भाकरीचा आणि कपडय़ाचा प्रश्न आजही सोडविता आला नाही. आजही अनेक समाज सावकाराच्या जाचाने आणि परिस्थितीने तुडविला जात आहे. अशा उपेक्षित समाजाची दशा आणि दिशा मांडून रसिकांना भावनाविवश करण्याचे काम चंद्रपूरच्या कलावंतांनी सादर केलेल्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाने केले.  
राज्यनाटय़ स्पर्धेत गुरुवारी हेमंत मानकर लिखित आणि जयश्री कापसे दिग्दर्शित ‘चिंधीबाजार’ या नाटकाचा प्रयोग सायंटिफिक सभागृहात झाला. या नाटकाने रसिकांवर चांगलीच छाप पाडली. चिंधीबाजार ज्या जागेवर भरतो ती जागा महापालिका प्रशासनाची राखीव असते. या बाजारातल्या महिला, चहावाला, समाजव्यवस्थेची चीड बाळगणारा बाबू आणि संबंधित सर्व प्रशासनाच्या विरोधात बंड पुकारतात. हाच संघर्ष या नाटकात साकारला आहे. या नाटकातील मध्यवर्ती भूमिका असलेल्या गंगूबाई या पात्राच्या भूमिकेतून कथानक पुढे समोर सरकते. यात असणाऱ्या महिलांची परवड, त्यांना सहन करावा लागणारा गरिबीचा त्रास, असे एक एक प्रसंग उलगडत जाऊन ‘चिंधीबाजार’चे खरे चित्र प्रेक्षकांसमोर उभे राहते. चिंधीबाजाराशिवाय बोहारणीचे कौटुंबिक भावविश्व, परिवाराचा उदरनिर्वाह, समाजासाठी कार्य करण्याची गंगूबाईची तळमळ हा सर्व कर्माचा खेळ अत्यंत भावनिकपणे मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पोटाची खळगी भरत प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या बोहारणीची व्यथा उलगडणारा बाजार म्हणजे ‘चिंधीबाजार’ होय.