महाविद्यालयाच्या परिसरातील कॅन्टीनसमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. नेमके काय झाले ते कोणालाच समजत नाही. बेशुद्ध होऊन पडलेल्या ‘त्या’मुलीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले जातात आणि ती मुलगी शुद्धीवर येते. त्याचवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तिथून जात असताना तेथे डोकावतात. बघतात तो काय, आपलीच मुलगी तेथे त्यांना दिसते. ती मुलगी आपल्या वडिलांकडे पाहते आणि..
पुण्याजवळच्या वडगाव येथील सिंहगड इन्स्टिटय़ूट विद्या संकुलाच्या प्रांगणातील हे दृष्य ‘शार्प आय प्रॉडक्शन’च्या आगामी ‘कॅम्पस कट्टा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक भाग होते. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (महाविद्यालयाचे प्राचार्य), नवोदित अभिनेत्री नम्रता गायकवाड (प्राचार्याची मुलगी) आणि सुमारे ३० विद्यार्थी या चित्रीकरणात सहभागी झाले होते. अवघ्या १८ वर्षांचा  प्रथमेश गडवे हा निर्माता तर संदीप चाफेकर हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘तानी’, ‘रंगकर्मी’ या चित्रपटांचे दिग्दर्शक संजीव कोलते हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.
तथाकथित शिक्षणसम्राट, शिक्षणाकडे केवळ व्यवसाय/धंदा म्हणून पाहून एकमेकांवर सुरू असलेली कुरघोडी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, शिक्षणसम्राट व त्यांच्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरोधात उभा ठाकणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी, महाविद्यालयाच्या प्राचार्याची मुलगी, त्या दोघांचे प्रेम, प्रेमाला वडिलांचा विरोध, मैत्रीण यांची गोष्ट म्हणजे ‘कॅम्पस कट्टा’, असल्याचे  कोलते यांनी सांगितले.
शिक्षण सम्राटांच्या भूमिकेत अरुण नलावडे आणि मिलिंद शिंदे असून चित्रपटातील अन्य भूमिकेत संतोष जुवेकर, नम्रता गायकवाड, शीतल दाभोळकर, किशोरी शहाणे, राहुल रानडे, प्रफुल्ल सामंत हे कलाकार आहेत.