आपल्या बोलण्यातून समोरच्याची सहज विकेट काढणारे आनंद इंगळे आणि भाऊ कदम याचं शीतयुद्ध सध्या चांगलंच रंगलंय. एरव्ही इतरांची विकेट काढणाऱ्या या दोन अभिनेत्यांनी एकमेकांचीच विकेट काढण्याचा चंग बांधला आहे. आनंद आणि भाऊच्या या शीतयुद्धाला शहर संस्कृतीचा अभिमान कारणीभूत ठरला आहे. प्रत्येकाला आपल्या शहराचा अभिमान असतो. या शहरी संस्कृतीचा अभिमान बाळगत या अभिनेत्यांच शीतयुद्ध १२ जूनला येणाऱ्या ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या चित्रपटात रंगलेलं पहायला मिळणार आहे.
कोल्हापूरचे जमीनदार आप्पा कोळसे पाटील आणि शास्त्रीय गायनाची आवड असलेले पुण्याचे श्रीमंत कारखानदार भीमसेन कारखानीस यांची कथा ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. परस्परविरुद्ध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या दोन धम्माल कुटुंबाची, त्या दोन कुटुंबातील इरसाल माणसांची आणि त्यांच्या कचाट्यात सापडलेल्या दोन प्रेमिकांची कुरकुरीत आणि तितकीच भन्नाट गोष्ट म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट घडवत आनंद इंगळे यांचा ‘पुणेरी बाणा’ व भाऊ कदम यांचा ‘कोल्हापुरी ठसका’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.
‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झी टॉकीज आणि रत्नकांत जगताप यांनी केली असून  दिग्दर्शक संजय झणकर आहेत. कथा-पटकथा व संवाद सुनिल हरिश्चंद्र यांचे आहेत. छायाचित्रण गौरव पोंक्षे यांचं असून संकलन साहिल तांडेल यांचं आहे. आनंद इंगळे, भाऊ कदम यांच्यासह किशोर चौघुले, शैलजा काणेकर विशाखा सुभेदार, संजय मोहिते, गणेश रेवडेकर, रवींद्र तन्वर या विनोदवीरांच्या फौजेसह ऋतुराज फडके, शाश्वती पिंपळकर ही फ्रेश जोडी यात आहे. मधु इथे अन चंद्र तिथे १२ जूनला  आपल्या  भेटीला येणार आहे.