राम के नाम या माहितीपटाला युट्युबवर यूऐवजी ए प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. आनंद पटवर्धन यांनी हा माहितीपट तयार केला होता. या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. आता 28 वर्षांनी या माहितीपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. यामुळे आनंद पटवर्धन यांनी फेसबुकवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राम के नाम हा माहितीपट पाहण्यासाठी आता तरूणांना 18 वर्षे वयोमर्यादा घालण्यात आली आहे ही बाब निराशाजनक आहे अशा आशयाची एक पोस्ट आनंद पटवर्धन यांनी पोस्ट केली आहे. या माहितीपटाला युट्यूबवर 2 लाख 86 हजार 985 व्ह्यूज आहेत. तरीही या व्हिडिओला ए सर्टिफिकेट दाखवण्यात आले आहे. या देशात 18 वर्षांखालील मुले बालमजूर म्हणून काम करू शकतात मात्र एक माहितीपट पाहण्यासाठी त्यांना प्रौढ व्हावे लागणार आहे तशी मर्यादा घालण्यात आली आहे ही बाब वेदना देणारी आहे असेही पटवर्धन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे राम के नाम?
राम के नाम हा एक माहितीपट आहे. या माहितीपटात रामजन्मभूमीचा वाद, बाबरी मशीद याबद्दलचे विस्तृत वर्णन आहे. या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे. आता राम मंदिराची चर्चा देशभरात रंगते आहे अशात या माहितीपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आले आहे. याबाबत पटवर्धन यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 4:08 pm