तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?
जगण्याच्या क्षणाक्षणांत आनंद कोण भरते?
कोण लिहिते कविता आणि कोण रचते गीत?
कुणाच्या सुरांशी आपली जुळून जाते प्रीत?
कोण आणते हसू ओठी, आनंदाश्रू नेत्री?
ते सारे जे आम्हा लाभले दिग्गज आनंदयात्री

स्वत:चे आणि इतरांचे आयुष्य आनंदाने भरुन टाकणाऱ्या आणि शब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम म्हणजे ‘आनंदयात्री’. कलेच्या माध्यमातून रसिकांचं जीवन आनंदमयी करणाऱ्या दिग्गजांच्या कारकिर्दीचा लेखाजोगा या कार्यक्रमातून घेण्यात येणार आहे.

‘आनंदयात्री’च्या पर्वाची सुरुवात झाली शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांनी. बाबूजींचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे स्टार प्रवाहच्या वतीने ही अनोखी स्वरांजली वाहण्यात आली. अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी बाबूंजींची गाणी नेमकी कशी जन्माला आली? या गाण्यांच्या निर्मिती मागे काय प्रेरणा होती? याचा लेखाजोगा स्टार प्रवाह प्रस्तुत ‘आनंदयात्री’ या कार्यक्रमातून घेण्यात आला.

सुधीर फडके यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या खास उपस्थितीत बाबूजींच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. बाबूजींची गाणी आजही मनामनात घर करुन आहेत. ‘आनंदयात्री’च्या निमित्ताने या गाण्यांचे सूर पुन्हा एकदा घुमले. श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अशोक पत्की, रवींद्र साठे, सावनी रविंद्र, प्रियांका बर्वे आणि हृषिकेश रानडे यांनी बाबूजींची अजरामर गीतं सादर करत मैफलीत रंग भरले. या सांगीतिक मैफलीचं सूत्रसंचालन केलं गिरीजा ओक गोडबोलेने.

या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आनंदयात्री हा फक्त कार्यक्रम नसून ती एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल याची आम्हाला खात्री आहे.’

मुंबईमधील रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच ‘आनंदयात्री’ सोहळा पार पडला. या खास कार्यक्रमासाठी अजिंक्य देव, अलका कुबल-समीर आठल्ये, निशिगंधा वाड – दिपक देऊळकर, किशोरी शहाणे विज, आदेश-सुचित्रा बांदेकर, सचिन खेडेकर, स्वप्निल जोशी, सुमीत-चिन्मयी राघवन, अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, देवकी पंडित यांच्यासह अनेक मराठी टिव्ही आणि चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली.

१० मार्चला सायंकाळी ७ वाजता ही अनोखी मैफल स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.