भविष्यवेधी विज्ञान आणि भविष्य वर्तवणारं ज्योतिषशास्त्र यांत फरक काय? विज्ञानात कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्यासंबंधीचे सबळ आणि ठोस पुरावे द्यावे लागतात. केवळ तर्काधारे वा अनमानधपक्याने कुठलीही गोष्ट विज्ञानात मान्य केली जात नाही. ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ असा रोखठोक मामला असतो विज्ञानात. ज्योतिषशास्त्रात असं काही ठोसपणे सिद्ध करावं लागत नाही. त्याला कसलं शास्त्र असेलच तर ते अद्याप तरी सिद्ध झालेलं नाही. ज्योतिषांकडून तर्क आणि अनुमानाच्या आधारे भविष्यवाणी वर्तवली जाते. ती जर चुकली तर नेमकी कशामुळे, हे ठोस शास्त्राधारे सांगता येत नाही. मात्र, विज्ञानाधिष्ठित गोष्टींत काही चूक झालीच तर नेमकं काय चुकलं आणि ते का चुकलं, याचा शास्त्राधारे शोध घेता येतो. (अर्थात विज्ञानालाही अजून सर्व गोष्टी उलगडल्या आहेत असं नाही. त्याविषयीचं संशोधन अविरत सुरूच आहे.) परंतु विज्ञानानं लावलेल्या शोधांचा आणि त्यांतून निर्माण झालेल्या आधुनिक सुखसुविधांचा पुरेपूर उपभोग घेत असूनही सामान्य माणसांच्या मनातल्या अंधश्रद्धा मात्र नष्ट होत नाहीत, हे दुर्दैवी आहे. मानगुटीवरचं रूढी-परंपरांचं उतरवता न येणारं जोखड म्हणा वा भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे म्हणा; माणसं ज्योतिष आदी गोष्टींवर विश्वास करतात. स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारी माणसंही कधी कधी संकटात सापडली की ईश्वराचा धावा करतात. भारतीय लोकमानसात ही विसंगती कायम अनुभवायला मिळते. अंधश्रद्ध असण्याचा माणसाच्या शिक्षणाशी काही संबंध नसतो. काही माणसं तळ्यात-मळ्यात असतात. त्यांना विज्ञानाने लावलेल्या शोधांचे लाभही हवे असतात आणि (समजा) अस्तित्वात असलाच कुणी परमेश्वर- तर उगा रिस्क का घ्या, म्हणून ते देवबिव आणि ज्योतिषशास्त्र इत्यादीवरही विश्वास ठेवतात. तर ते असो.

नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण- ‘अंदाज आपला आपला’ हे नवं नाटक! राजेश कोळंबकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित हे नाटक असंच तळ्यात-मळ्यात छापाचं आहे. ज्यात ज्योती नामक ज्योतिष जाणणाऱ्या एक बाई आहेत. त्यांचा ज्योतिषाचा धंदा जोरात आहे. खराडे नावाचे गृहस्थ त्यांचे मदतनीस म्हणून त्यांच्याकडे काम करतात. या बाईंचे पती अकाली गेल्यानंतर त्यांनी पोटापाण्यासाठी हा व्यवसाय स्वीकारलाय. त्यांना एक कन्या आहे.. गुणप्रिया. कॉलेजात जाणारी. ज्योतिषशास्त्र हे भंपक असल्याचं मानणारी. तरीही आपल्या मुलीने आपला हा व्यवसाय पुढे चालवावा अशी बाईंची इच्छा आहे. पण लेक ज्योतिषशास्त्राची खिल्ली उडवत असल्याने त्यांची ही इच्छा सफल होण्याची शक्यता नाही हे त्यांना कळून चुकतं. खराडे यावर त्यांना लेकीचं लग्न करून जावयास या व्यवसायाची दीक्षा द्या असा सल्ला देतात. याचदरम्यान समीर हा तरुण त्यांच्याकडे ज्योतिष शिकण्याच्या मिषाने येतो. आधी तर त्या त्याला नकारच देतात. परंतु नंतर त्याच्यात ‘जावई मटेरियल’ असल्याचं  ध्यानी आल्यावर त्या ज्योतिष शिकवायला राजी होतात. समीरकडे आपली आई संभाव्य जावई म्हणून बघतेय हे लक्षात येताच गुणप्रिया त्याला हडतहुडुत करते. मात्र, समीरचं आपल्यावरील नि:संशय प्रेम पाहिल्यावर तिचं मनपरिवर्तन होतं.

लेखक राजेश कोळंबकर यांनी विज्ञान विरुद्ध ज्योतिषशास्त्र असा संघर्ष नाटकात उभा केला आहे खरा; परंतु त्यात ठोस असं मतप्रतिपादन त्यांनी केलेलं नाही. ती एक लुटुपुटूची लढाईच वाटते. याचं कारण- आशय आणि त्याच्या मांडणीबद्दल लेखकाच्या मनात असलेला गोंधळ! दुसरी गोष्ट- नाटक करमणूकप्रधान(च) करायचं आहे, हे पूर्वनिश्चित असल्याने या विषयातील तार्किक संघर्षही बोथटला आहे. प्रतिपाद्य विषयाच्या सर्व बाजूंचा लेखकानं विचारच केलेला नाही. विषयाची उथळ मांडणी करून प्रेक्षकांना फक्त रिझवायचं, हाच हेतू असल्यानं त्याला गंभीर फाटे फुटणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली आहे. सबब नाटक मिळमिळीत झालं नसतं तरच नवल. शब्दांचे खेळ, कोटय़ा, प्रसंगनिष्ठ विनोद यावर भर देत प्रेक्षकांचं रंजन हेच साध्य समोर ठेवून नाटकाची रचना केली गेली आहे. त्यामुळे हाती काहीच लागत नाही. दिग्दर्शक संतोष पवार यांनीही नाटकाचा मूळ हेतू नजरेसमोर ठेवूनच नाटक बसवले आहे. त्यामुळे नाटकात कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव शोधणे फिजूल आहे. मात्र, सामान्य प्रेक्षकाचं पुरेपूर रंजन होईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. आणि याकामी ते स्वत:च खराडेच्या भूमिकेत आघाडीवर आहेत. संतोष पवार यांचा हा एकपात्री प्रयोग आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांना वजा केलं तर नाटकात काहीच उरत नाही. विशेषत: ज्योती आणि समीर या पात्रांची नेमकी ‘भूमिका’ काय, असा प्रश्न पडतो. ज्योती या अंधश्रद्धाग्रस्तांचं प्रतिनिधित्व करत ज्योतिषशास्त्राची न पटणारी भलामण करतात. तर समीर हा ज्योतिषशास्त्राच्या बाजूचा आहे की विरोधी, हे ते पात्र साकारणाऱ्या अक्षय केळकर यांना तरी कळलं आहे की नाही, समजायला मार्ग नाही. गुणप्रिया मात्र विज्ञाननिष्ठ आहे. खराडे हे इधर भी है और उधर भी. ते सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करतात. कारण त्यांना हेही पटतं आणि तेही. असो. संतोष पवार यांच्यामुळेच नाटक बघणीय होतं. त्यांचे उत्स्फूर्त, हजरजबाबी आणि टायमिंगने टाकलेले विनोद नाटकाच्या आशय-विषयाकडे काणाडोळा करायला भाग पाडतात. जसं मच्छिंद्र कांबळी नाटक कुठलंही असो- ते जे काही रंगमंचावर करीत ते प्रेक्षकांना आवडे, तसंच संतोष पवारांचंही आहे. ते उत्तम सोंगाडे असल्याने प्रेक्षकांची नाडी त्यांना पुरती कळलेय. त्याचा पुरेपूर वापर त्यांनी या नाटकात केला आहे.

अंधश्रद्धेचं टोक गाठलेल्या ज्योतिषाचारी ज्योती या भूमिकेत माधवी गोगटे कायम संभ्रमावस्थेत वावरताना दिसतात. त्यांना संहितेचं पाठबळ नसल्याने त्यांची त्रेधातिरपिट उडाली आहे. तीच गोष्ट समीर झालेल्या अक्षय केळकर यांचीही. त्यांनाही धड ना इकडचे, ना तिकडचे असं दाखवल्यानं त्यांचीसुद्धा पंचाईत झाली आहे. मधुरा देशपांडे यांनी मात्र गुणप्रिया चोख वठवली आहे.