बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर इश्वर बिदरी यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ते कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. इश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

इश्वर बिदरी बॉलिवूडमधील एक नामांकित सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जायचे. १९७१ साली ‘कारवा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘हातिम’, ‘हत्यार’, ‘अंगार’, ‘इन्साफ’ ‘अपने लहूसे’, ‘मेरे दो अनमोल रतन’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली. ‘अंदाज अपना अपना’, ‘बॉर्डर’, ‘अंदाज’ हे त्यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखले जातात. किंबहूना या चित्रपटांमुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. सिनेमॅटोग्राफीसोबतच त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. इश्वर बिदरी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.