‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा चित्रपट पाहताना ४३ वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आंध्रप्रदेशमधील कडपा जिल्ह्यात घडली. पी. बाशा असे या मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून तो एका बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करायचा.

कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सिनेमागृहात कामगारांसाठी  तिकिटांमध्ये विशेष सूट देण्यात आली होती. पी. बाशानेही या संधीचा लाभ घेण्याचे ठरवले आणि तो ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा थ्री डी चित्रपट बघण्यासाठी गेला. चित्रपट संपल्यावरही बाशा खुर्चीवर बसून होता. काही वेळाने तो जागेवरुन उठेल, असे सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांना वाटले. बाकीचे प्रेक्षक निघून गेल्यावर अखेर एक कर्मचारी बाशाजवळ गेला. त्याने बाशाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. कर्मचाऱ्याने बाशाच्या डोळ्यावरील थ्री डी चष्मा काढताच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पी. बाशाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवालावरुनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.