कर्करोगकारक जनुकीय उत्परिवर्तन आढळून आल्याने प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिने दोन्ही स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (मास्टेक्टॉमी) करून घेतली आहे. स्तनाचा कर्करोग असलेल्या असंख्य महिलांना या निर्णयामुळे सक्षमतेचा संदेश मिळावा, असे आपल्याला वाटत असल्याचे तिने ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकी अध्यक्षांच्या पत्नी बेटी फोर्ड यांनीही १९७४ मध्ये असा धाडसी निर्णय घेतला होता. अमेरिकेत साडेसात लाख स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगास कारण ठरणारे जनुकीय उत्परिवर्तन आहे. कर्करोगाची सतत भीती होती त्यामुळे हे सावट दूर करण्यासाठी आपण दोन्ही स्तन व अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतली असे तिने म्हटले आहे.
ज्या स्त्रियांमध्ये जनुकीय पातळीवर कर्करोगाची शक्यता जास्त आहे त्यांच्या दृष्टीने अँजेलिना जोलीच्या निर्णयाने एक प्रकारचे आश्वासक वातावरण तयार झाले असले तरी काही तज्ज्ञांच्या मते यामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. कारण सगळ्याच स्त्रियांमध्ये स्तन काढून टाकण्याइतकी स्थिती विकोपाला गेलेली नसते. अँजेलिनाच्या जनुकीय चाचण्यात असे दिसून आले होते की, तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ९० टक्के आहे व आता ती केवळ पाच टक्के इतकी खाली आली आहे.
अँजेलिनाने म्हटले आहे की, ब्रॅका १ या जनुकीय उत्परिवर्तनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यामुळे अंडाशयाचा तसेच स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढली होती. आपल्या मातोश्री कर्करोगामुळे निवर्तल्या व त्यामुळे यात आनुवंशिकतेचा मोठा भाग होता. ज्या स्त्रियांमध्ये ब्रॅका जनुकाचे उत्परिवर्तन दिसून येते अशा ३३ टक्के स्त्रिया स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे पसंत करतात असे डॉ. केनेथ ऑफिट यांनी सांगितले. डॉ. मोनिका मॉरो याच्या मते फार थोडय़ा स्त्रिया अशा असतात ज्यांना ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.
मुळात ब्रॅका जनुकीय उत्परिवर्तनाची चाचणी ही महाग म्हणजे ३००० डॉलर खर्चाची असते त्यामुळे त्याची शिफारस सहसा केली जात नाही हा एक मुद्दा यात आहे. डॉ. डॉमचेक यांच्या मते काही स्त्रिया सतत मॅमोग्राम चाचणी करून त्यावर नियंत्रण ठेवू शकतात. त्यावर काही औषधेही आहेत पण जिथे जनुकीय चाचणी पॉझिटिव्ह येते त्यात स्तन काढून टाकणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.