चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि कंगना रनौतची बहिण रंगोली चंदेल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचे पहायला मिळते. दोघेही सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. सध्या देशात करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. तसेच त्यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करुन गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर अनुराग कश्यपने ट्विट करत मोंदीवर निशाणा साधला होता. पण आता त्याच्या या ट्विटला उत्तर देत रंगोलीने चांगलेच सुनावले आहे.

‘माझा एक प्रश्न होता. मेणबत्ती आणि दिवा कुठे मिळेल? औषधांच्या दुकानात की किराणा किंवा भाजीच्या दुकानात? दिवा आणि मेणबत्ती सुद्धा महत्त्वाच्या सामानामध्ये येते का? आणि या दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही तर मी दुनिया जाळून टाकू शकतो का? माझ्याकडे काडीपेटी मात्र आहे’ असे अनुरागने ट्विट केले होते.

अनुरागच्या ट्विटवर रंगोलीने उत्तर देत त्याला चांगलेच सुनावले आहे. ‘संपूर्ण दुनिया तू जाळू शकत नाहीस पण स्वत:ला मात्र नक्की जाळू शकतोस. त्याची तुला परवानगी आहे. इतर लोकांचे जगावर आणि स्वत:च्या जीवनावर प्रचंड प्रेम आहे. सर त्यांना जगू द्या. तुम्हीच या जगाला कंटाळला आहात. त्यामुळे कृपया तुम्हीच फक्त कल्टीमारा’ असे रंगोलीने ट्विटमध्ये म्हटले.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत,” असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचे आहे, ” असे भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केले आहे.