रेश्मा राईकवार

अंग्रेजी मीडियम

दोन वर्षांपूर्वी ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा उद्देश एकदम सरळसाधा होता. इंग्रजी माध्यमांतून मुलाला शिक्षण मिळावे, यासाठी पालकांचा सुरू असलेला आटापिटा आणि त्यातला फोलपणा जाणवल्यावर आपल्या मुळांकडे परतलेले जोडपे हा त्या चित्रपटाचा विषय होता. ‘अंग्रेजी मीडियम’ या त्याच्या सिक्वलमध्ये ही कथा आणखीन पुढे गेली आहे. इंग्रजी शिकण्याचा हा अट्टहास परदेशात पोहोचला आहे आणि एकदा कथेतच विषयाने सातासमुद्रापार उडी घेतली की तो फक्त कोणत्या एका माध्यमातून शिक्षण घेण्याचा विषय उरत नाही. तिथे परदेशाचे आकर्षण, व्यक्तिस्वातंत्र्याचा सोस अशा अनेक समस्यांना तोंड फुटते. हे सारे फुटणारे विषयाचे पदर एका कथेत बांधण्याचा प्रयत्न होमी अडजानिया दिग्दर्शित ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात केला गेला आहे. आता रसिकमनाला याचा भार न झाला तरच नवल!

उदयपूरमधील घसिटाराम परिवार. या परिवाराचा वंशवृक्ष फारच विस्तारलेला आहे आणि जेवढय़ा त्याच्या शाखा-उपशाखा आहेत त्या सगळ्याच एकमेकांत हातपाय अडकवल्यासारख्या गुंतवलेल्या आहेत. आणि तरीही विविधतेत एकता अशा न्यायाने नांदणाऱ्या या कुटुंबाच्या दोन महत्त्वाच्या शाखा चंपक बन्सल (इरफान खान) आणि घसिटेराम बन्सल (दीपक दोब्रियाल). या दोघांबरोबरच त्यांच्या इतर परिवारांमध्येही कोणत्या हलवायाचे दुकान मूळचे घसिटाराम आहे यावरून न्यायालयीन वाद सुरू आहेत. या वादातही हे सगळे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदते आहे. चंपकच्या याव्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत. एक म्हणजे तो आयुष्यात कायमच गोंधळलेला आहे. हे करू की ते करू? या विचारातच आयुष्य घालवलेला चंपक आपल्या मुलीच्या तारू च्या (राधिका मदन) बाबतीत मात्र प्रचंड हळवा आहे. तारूला जे हवे आहे ते तिला करता आलेच पाहिजे, हे एकच त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लहानपणापासून परदेशात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेली तारू शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा निर्धार करते. लंडनमध्ये ट्रय़ुफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी ती दिवसरात्र एक करते. पण चंपकच्या हातून झालेल्या एका चुकीमुळे तारूची ही संधी हुकते. इथून पुढे तारूचे हे लंडनला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंपकची धडपड सुरू होते. या प्रवासात चंपकला त्याच्या भावाची घसिटेरामची साथ मिळते. अंग्रेजी देशात जाऊन अंग्रेजी शिकण्याचे तारूचे स्वप्न चंपक पूर्ण करतो का? याची ही कथा आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ची कथा वरवर पाहायला गेले तर खूप मजेशीर आहे. मुलीच्या हट्टापायी सगळे काही विसरून त्यासाठी धडपडणारा बाप, प्रत्यक्षात लंडनपर्यंत पोहोचण्यासाठीची त्याची धडपड ही गोष्ट तितक्याच सहजतेने पडद्यावर रंगवताना अभिनेता इरफान खानला पाहणे ही या चित्रपटाची मोठी पर्वणी म्हणायला हवी. इथे खरे म्हणजे इरफान आणि त्याच्या मुलीच्या भूमिकेतील राधिका मदन यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळणार ही अपेक्षा आहे. ती बव्हंशी पूर्णही होते, मात्र चंपक आणि तारूपेक्षाही चंपक आणि घसिटेराम यांची केमिस्ट्री खऱ्या अर्थाने यात जुळून आलेली आहे. पूर्वार्धात गोष्ट पुढे सरकता सरकेना अशी स्थिती आहे, तर उत्तरार्धात मात्र लंडनवारीतला गोंधळ वेगाने आपल्यासमोर येतो. हा गोंधळ येतो तोच खूप साऱ्या व्यक्तिरेखांना घेऊन येतो. चंपक आणि घसिटेराम, तारूच्या आयुष्यात नव्याने येणारे मित्र, ज्यांच्याकडे हे भाडय़ाने राहतायेत त्या घराची मालकीण कोहली (डिंपल कपाडिया), पोलीस अधिकारी नैना (करीना कपूर), चंपक-घसिटेरामचा लंडनमधला मित्र बबलू (रणवीर शौरी), त्यांना दुबईतून लंडनमध्ये जायला मदत करणारा टोनी (पंकज त्रिपाठी) अशा अनेक व्यक्तिरेखा एकामागोमाग एक आदळतात. कथानकात त्या छोटय़ा-छोटय़ा संदर्भापुरत्या येतात. एकतर हे सगळेच उत्तम कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना अगदीच पाहुण्या भूमिकेत पाहणेही तितकेसे रुचत नाही. त्यातल्या त्यात चंपकच्या मित्राच्या गज्जूच्या भूमिकेतील किक्कू शारदाला पहिल्या फ्रेमपासून संधी मिळाली आहे, आणि त्यामुळे त्याला बऱ्यापैकी वाव मिळाला आहे. त्यानेही त्याचा योग्य तो फायदा करून घेतला आहे. इरफान खान आणि दीपक दोब्रियाल हे दोघेही कसलेले कलाकार आहेत. इरफानने तर आजारपणाच्या काळात हा चित्रपट केला आहे, मात्र त्याच्या अभिनयावर इंचभरही परिणाम झालेला दिसत नाही. त्याला दीपक दोब्रियालच्या भूमिकेने उत्तम साथ दिली आहे. राधिका मदनही तारूच्या भूमिकेत सहजपणे वावरली असली, तरी तिच्या भूमिकेचा हवा तसा प्रभाव पडत नाही.

उत्तम कलाकार असूनही त्याचा हवा तसा प्रभाव पडत नाही, याचे कारण चित्रपटाच्या कथेत दडलेले आहे. एकाच कथेत व्यक्तिस्वातंत्र्याचा आजच्या पिढीचा आग्रह, भारतीय संस्कार आणि मूल्ये.. मग त्याची होणारी तुलना आणि त्यासाठी चंपक-तारू, मिसेस कोहली-नैना अशी जोडलेली पात्रे या सगळ्या त्याच त्याच पद्धतीच्या गोष्टी येतात. वडील आणि मुलीच्या नात्यावरच कथा केंद्रित राहिली असती तरी त्याचा योग्य प्रभाव पडला असता. नव्या चित्रपटाची कथा चार लेखकांनी मिळून लिहिली आहे आणि दिग्दर्शन होमी अडजानिया याने केले आहे. दिग्दर्शक म्हणून होमीचे आधीचे तिन्ही चित्रपट लोकांनी उचलून धरले होते. तो या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा दिग्दर्शक आहे.

* दिग्दर्शक – होमी अडजानिया

* कलाकार – इरफान खान, राधिका मदन, दीपक दोब्रियाल, किक्कू शारदा, डिंपल कपाडिया, करीना कपूर, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी, तिलोत्तमा शोम