फॅशन जगतात अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असणारा ‘लॅक्मे फॅशन वीक’ नुकताच पार पडला. विविध सेलिब्रिटी आणि नव्या जोमाच्या फॅशन डिझायनरच्या मांदियाळीत हा कार्यक्रम सध्या पार पडला. पण, सध्याच्या घडीला या कार्यक्रमाच्या आयोजकांमुळे अभिनेत्री ईशा देओलचा राग अनावर झाल्याचं कळत आहे.

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री ईशा देओल तिच्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत रॅम्पवर आली होती. पारंपरिक पेहराव आणि त्याला साजेशा लूकमध्ये या दोघींनीही सर्वांचीच मनं जिंकली. पण, रॅम्प वॉकनंतर मात्र ईशाचा राग अनावर झाला आणि तिने माध्यमांसमोर हात जोडत त्या ठिकाणहून काढता पाय घेतला.

रॅम्प वॉकनंतर होणारं फोटोशूट आणि माध्यमांशी होणारा संवाद या गोष्टींमध्ये आयोजकांची ढवळाढवळ आणि कार्यक्रमाच्या आयोजनात झालेली हेळसांड यांमुळे तिचा राग अनावर झाला. तिने क्षणार्धाचाही विचार न करता त्या कार्यक्रमातून निघण्याचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे तिच्या रागाचा असा अचानक चढलेला पारा पाहून हेमा मालिनी यांनाही काही क्षणांसाठी परिस्थितीचा अंदाज लावता आला नाही. पुढे गेल्यानंतर ईशाने पुन्हा मालिनी यांना हाक मारली आणि त्यांनाही त्या ठिकाणहून निघण्यास सांगितलं.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रॅम्प वॉकनंतर फॅशन डिझायनरसोबत फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरु होता. ज्यांतर गोंधळलेल्या आयोजकांनी ईशाच्या हाती माईक सोपवला. आपल्याकडे हा माईक का देण्यात आला आहे, हे ईशाला कळलंच नाही. पुढे काय करायचं आहे, हा प्रश्न ती सतत आयोजकांना विचारत होती. पण, त्याच्याकडून तिला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तिथेच दुसरीकडे हेमा मालिनी माध्यमांच्या प्रश्नाचं उत्तर देत होत्या. त्याचवेळी आणखी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. ज्यानंतर इथे कोणतीही पत्रकार परिषद सुरु नसल्याचं आयोजकांच्या एका टीममधील व्यक्तीने सांगितलं. आयोजक स्वत:च फार गोंधळल्यामुळे आणि सुरु कार्यक्रमात वारंवार त्यांची ढवळाढवळ केल्यामुळे अखेर तिचा राग अनावर झाला. पण, त्यावरही ताबा ठेवत आपल्याला काय सुरु आहे .हे काहीच कळत नसल्याचं तिने स्पष्ट केलं. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तर आयोजकच देतील, असं म्हणत तिने त्या ठिकाणहून निघण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आईला म्हणजेच हेमा मालिनी यांनाही तेथून निघण्याचा इशारा केला ज्यानंतर त्याही तेथून निघून गेल्या.

इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आयोजनाच्या बाबतीत सहसा हेळसांड होत नाही. पण, ईशाच्या बाबतीत घडलेला प्रकार पाहता सध्याच लॅक्मे फॅशन वीकमध्ये झालेल्या याच गोंधळाची चर्चा कलाविश्वात सुरु आहे.