19 October 2019

News Flash

बॉक्स ऑफीसवर ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाची गाडी सुसाट

अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा 'एकदम कडक' प्रतिसाद मिळत आहे.

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाच्या टीझरपासून संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाली. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा ‘एकदम कडक’ प्रतिसाद मिळत आहे.

८ नोव्हेंबर रोजी ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटासोबतच ‘ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाने आमिरच्या चित्रपटाला चांगली टक्कर दिली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

चित्रपटामधील कलाकरांचा उत्तम अभिनय, कथा यामुळे प्रेक्षक चित्रपटाला उदंड प्रतिसाद देत आहेत. यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय– अस्ताचा प्रवास दाखविण्यात आला आहे. सुबोध भावे याने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली असून तो ही व्यक्तिरेखा जगला आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षक- समीक्षक देत आहेत. काशिनाथ घाणेकर यांचा लूक, संवाद फेक, अस्वस्थता, बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांचे अभिनयाबद्दलचे वेड हे अतिशय उत्तमप्रकारे सुबोध भावेने साकारले आहे आणि हेच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे. चित्रपटामधील सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन जोशी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, नंदिता धुरी यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील रंगभूमीचे, नाटकाचे महत्व, उतरती कळा लागल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरण्याचा केलेला प्रयत्न, काशिनाथ घाणेकर आणि इरावती घाणेकर तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर आणि कांचन घाणेकर यांचा प्रवास, अशा विविध छटा उत्तम प्रकारे सुबोध भावेने या चित्रपटामध्ये साकारल्या आहेत. मराठी चित्रपट आणि रंगभूमीचा सुवर्णकाळ या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो.

First Published on November 19, 2018 12:23 pm

Web Title: ani dr kashinath ghanekar marathi subodh bhave movie getting good response