‘आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुलोचनादीदींची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारणं सोनालीसाठी एका परीक्षेपेक्षा कमी नव्हतं. सुलोचनादीदींची भूमिका साकारणं हे जबाबदारीचं काम आहे. हा चित्रपट जेव्हा दीदी पाहतील त्यावेळी त्यांना मी साकारलेली भूमिका ही मनापासून आवडली पाहिजे आणि पटलीही पाहिजे असं सोनालीला मनापासून वाटतं होतं. यासाठी तिनं विशेष मेहनतही घेतली. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी पास होते की नापास हे कळणार आहे त्यामुळे मला खरी धाकधूक वाटते असं सांगत सोनालीनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’सोबत साधलेल्या संवादात आपली भीतीही व्यक्त केली.

‘सुलोचनादीदींना आपण पडद्यावर पहिलं. मात्र त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात आपण कधीही डोकावलं नाही. पण, ही भूमिका साकारताना त्यांचा संघर्ष किती मोठा होता याची जाणीव पदोपदी व्हायची. तो संघर्ष ऐकून प्रत्येक दृश्य साकारताना मी भावूक व्हायची. त्याची भूमिका साकरणं ही संधी नसून ती खूप मोठी जबाबदारी होती ‘ असे अनेक अनुभव सांगताना सोनाली भावूक झाली.

सोनलीच्या नजरेतून साकारल्या गेलेल्या सुलोचनादीदी कशा आहेत आणि तिचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा हा व्हिडिओ.

या चित्रपटात सुबोध भावे डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. सोनालीसोबतच मोहन जोशी, सुमित राघवन, प्रसाद ओक, आनंद इंगळे हे कलाकारदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.