बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव AK vs AK असं आहे. हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर भारतीय वायु सेनेनं आक्षेप घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान अनिल कपूर यांनी आक्षेपाची नोंद घेत या दृश्यासाठी वायु सेनेची माफी मागितली आहे.

“माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. या व्हिडीओमध्ये मी एका वायु सेनेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पटकथेनुसार त्या अधिकाऱ्याच्या मुलीचं अपहरण केलं जातं. त्यावेळी गोंधळलेला बाप जशी प्रतिक्रिया देऊ शकतो तशी मी देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाचाही अपमान करण्याच्या उद्देशाने हे दृश्य चित्रीत केलं गेलेलं नाही. त्यामुळे माझ्यामुळे जर कोणाचा अपमान झाला असेल मी हात जोडून त्यांची माफी मागतो.” अशा आशयाचं वक्तव्य करत एका व्हिडीओद्वारे अनिल कपूर यांनी माफी मागितली आहे.

यापूर्वी भारतीय वायु सेना काय म्हणाली होती?

“भारतीय वायु सेनेच्या गणवेशाला या व्हिडीओमध्ये चुकीचा पद्धतीने वापरलं आहे. शिवाय हा गणवेश परिधान केलेला व्यक्ती चुकीच्या भाषेत संभाषण करत आहे. या दृश्यामुळे भारतीय सैन्याचा अपमान होत आहे. त्यामुळे कृपया हा सीन चित्रपटातून काढून टाकावा.” असा इशारा ट्विटरच्या माध्यमातून भारतीय वायु सेनेनं दिला होता.