अमेरिकेतील ‘टम्पा कन्व्हेशन सेंटर’मधील ‘इंटरनॅशनल इंडिया फिल्म अॅकेडमी एक्स्पो’चे बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोद्वारे व्यापर, वस्तू पुरवठा आणि सेवा पुरविणाऱ्या भारतीय आणि अमेरिकन लोकांना एकत्र आणले जाणार आहे. या एक्स्पोद्वारे दोन देशांतील व्यापार आणि वाणिज्य सेवेच्या प्रचारासाठी चांगले व्यासपीठ लाभणार आहे. यावेळी बोलताना अनिल कपूर म्हणाले, या एक्स्पोचे उद्घाटन करून मी धन्य झालो. ही एक चांगली योजना आहे. लोकांशी भेटण्याचा आणि व्यावसायिक देवाणघेवाणीचा निश्चितच हा एक चांगला मार्ग आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर लोकांची उपस्थिती पाहून मला खूप बरे वाटले. एवढे लोक येतील असे मला वाटले नव्हते. टम्पा बेची माणसे खूप प्रेमळ असल्याचेदेखील ते म्हणाले. या एक्स्पोमध्ये कपडे, वधू पोषाख, दागिने, हस्तकलेच्या वस्तू आणि भारतीय खाद्यपदार्थ इत्यादींचे स्टॉल असणार आहेत. अनिल कपूरची एक झलक पाहाण्यासाठी त्याचे अनेक चाहते या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या या आवडत्या अभिनेत्याबरोबर हस्तांदोलन करण्याबरोबरच चाहत्यांनी त्याच्यासोबत छायाचित्रदेखील काढले. अनिल कपूरच्या चाहत्यांनी ‘राम लखन’ या त्याच्या चित्रपटातील ‘वन टू का फोर’ हे प्रसिध्द गाणेदेखील यावेळी गायले.