बॉलीवूड चाहते सध्या अनिल कपूर आणि अमृता सिंग या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला हा ५९ वर्षीय अभिनेता मात्र, अमृता सिंग आपली सर्व गुपित उघड करेल या भीतीने घाबरला आहे.
अनिल कपूर आणि अमृता सिंग हे ‘मुबारका’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बाझमी करणार आहे. सदर चित्रपटात अमृतासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याने अनिल कपूर खूप आनंदात आहे. मात्र, त्याचसोबत त्याला तिच्यासह काम करण्याची भीतीदेखील वाटतेय. कारण अमृता ही अत्यंत प्रामाणिक आणि सडेतोड उत्तर देणारी व्यक्ती आहे. बॉलीवूड लाइफ संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिलेय. जर तुम्ही मला विचाराल तर मी अमृतासोबत काम करायला खरंच खूप घाबरतोय. तिला माझी खूप सारी गुपितं माहित असून ती पटकन तोंडावर बोलते, असे अनिल कपूर म्हणाला. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘ठिकाणा’ चित्रपटात ही जोडी रोमान्स करताना दिसली होती. ‘मुबारका’ चित्रपटात अनिलचा पुतण्या आणि अभिनेता अर्जुन कपूर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढे अनिल म्हणाला की, मी घाबरतोय कारण एकदा का आम्ही काम करायला सुरुवात केली की, अमृता माझी सर्व गुपितं सांगाण्यास सुरुवात करेल. मेरे भांजे अर्जुन के सामने मेरी पुरी पोल खोल देगी अमृता.. ती स्पष्टवक्ती असून प्रामाणिक आहे. त्यामुळेच बहुदा आमच्या दोघांची चांगली मैत्री आहे. अनिल आणि अमृताने ‘ठिकाणा’, ‘चमेली की शादी’ आणि ‘साहेब’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
‘मुबारका’ या चित्रपटात अर्जुन कपूर, अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रूझ यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २८ जुलैला प्रदर्शित होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 4:32 pm