बॉलिवूडमधील झक्कास अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अनिल कपूर. यांचा उत्साह आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. गेल्या वर्षी अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘फन्ने खान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर ते लगेचच त्यांच्या आगामी चित्रपटांकडे वळले. त्याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला असून ते लवकरच उपचारासाठी परदेशात रवाना होणार आहेत.
अनिल कपूर यांच्याकडे आजही फिट आणि तंदुरुस्त अभिनेता म्हणून पाहिलं जातं. एव्हरग्रीन वाटणारा हा अभिनेता गेल्या २ वर्षांपासून ‘कॅलशिफिकेशन ऑफ शोल्डर’ या आजाराने त्रस्त असून एप्रिलमध्ये ते जर्मनीला उपचारासाठी रवाना होणार आहेत.
अनिल यांच्या उजव्या खांद्यामध्ये कॅल्शिमचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना सतत खांदेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या आजारावर लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. ‘सतत चित्रपटाचे शुटींग, साहसदृशांसाठी करावी लागणार मेहनत याचा परिणाम शरिरावर झाला असून त्यामुळेच खांदेदुखीची ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेच्या युगात जर स्वत:ला टिकवून ठेवायचं असेल तर हे सारं करावच लागतं’, असं अनिल कपूर म्हणाले.
अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच त्यांची लेक सोनम कपूर स्क्रीन शेअर करणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 4:26 pm