अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजूनही मुंबईतल्या गल्लीबोळात लहानाचा मोठा झालेल्या तरुणांचा टपोरीपणा अजूनही कायम आहे. ‘वेलकम बॅक’सारख्या चित्रपटात नानाबरोबर पुन्हा एकदा जमवलेली अभिनयाची भट्टी असेल नाहीतर त्यांच्या ‘२४’ या बहुचर्चित शोच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात असेल त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही ‘जबरदस्त’ असते. दर दोन वाक्यांनंतर येणारा त्यांचा ‘जबरदस्त’ आणि त्या शब्दाबरहुकूम डोळ्यात दिसणारी उत्साहाची चमक आपल्यालाही आनंद देते.
२०१३ साली अनिल कपूरने अमेरिकन शो ‘२४’चे कॉपीराइट्स विकत घेतले आणि त्याचा भारतीय अवतार प्रेक्षकांसमोर सादर केला. मर्यादित भागांच्या या अ‍ॅक्शनपॅक्ड मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मग मालिकेचा नायक जयसिंग राठोडची आणखी गोष्ट सांगायला हवी म्हणून आता तीन वर्षांनंतर या शोचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या पर्वाच्या निमित्ताने पुन्हा अनिल कपूरचा आनंद ओसंडून वाहतो आहे. शोच्या ट्रेलरचे प्रकाशन अभिनेता आमिर खान आणि सोनम कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आम्ही पुन्हा आलो रे.. अशी जोरदार हाकाटी करत आलेल्या आपल्या या शोबद्दलच अनिल कपूर पहिल्यांदा बोलणार ही आमची अटकळ एकेकाळी चेंबूरच्या गल्लीबोळात भटकलेल्या या टपोरी व्यक्तिमत्त्वाने मोडून काढली. आमची मराठी.. आमची मुंबई.. आता मराठी चित्रपटांनी खरी स्पर्धा केली.. अशा शब्दांत त्याच्या तोंडून कौतुकाचा झरा वाहू लागला आणि क्षणभर आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने तिकीटबारीवर ८५ कोटी रुपयांची कमाई करत हिंदीलाही दखल घ्यायला लावली नाही तर घाबरवून सोडलं आहे, त्याबद्दल त्यांना आनंद वाटत होता. या चित्रपटाचे यश पाहून मला माझे जुने दिवस आठवले. मी इथे चेंबूरमध्ये लहानाचा मोठा झालो तो मराठी माणसांमध्येच. माझे सगळे मित्र मराठी आहेत. त्यामुळे मराठी माणसं, भाषा, चित्रपट हा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे, असं त्यांनी सांगितलं. मी जेव्हा कधी चित्रीकरणाच्या निमित्ताने हैदराबादमध्ये, चेन्नईमध्ये किंवा कुठेही बाहेर जायचो आणि तिथे जेव्हा मल्याळी, तमीळ चित्रपटांच्या यशाची, त्यांच्या कमाईची चर्चा व्हायची तेव्हा मुंबईत मराठी चित्रपट का असा जोर धरू शकत नाहीत, हा सल कायम मनात असायचा. मराठी चित्रपटांनीही अशी फोडून कमाई केली पाहिजे, असं वाटायचं. आज कुठे ते यश पाहायला मिळतं आहे. इथून पुढे हा मराठी चित्रपटांच्या यशाचा सिलसिला कायम राहिला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मराठी चित्रपटांमुळे मराठी कलाकारांचा विषय निघणं साहजिक होतं. नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांची पडद्यावरही तितकीच चांगली गट्टी जमते. नानाचा ‘नटसम्राट’ही त्यांनी पाहिला आहे. नानाचा अभिनय हा चर्चा करण्यासारखी गोष्ट आहे का? तो सगळ्यात उत्तम अभिनेता आहे. त्याच्याबरोबर काम करण्याची मजाच और असते, अशा शब्दांत आपल्या मित्राचे ‘जबरदस्त’ कौतुक करणाऱ्या अनिल कपूर यांनी आपली ही उदय आणि मजनूभाईची हिट जोडी ‘वेलकम बॅक ३’मध्येही दिसणार असल्याचे सांगितले. मात्र त्याहीआधी आम्ही दोघे एक आणखी ‘जबरदस्त’ चित्रपट करणार आहोत. चित्रपटाची कल्पना वेगळी आहे, पटकथाही तयार आहे, अरे! ‘जबरदस्त’ आहे सगळं.. पण मी तुम्हाला बेताबेताने सांगेन त्याबद्दल असं म्हणत त्यांनी ही जबरदस्त कल्पना आमच्या डोक्यात सोडून दिली. ‘२४’ची मूळ अमेरिकन ओळख पुसून त्याचा भारतीय रिमेक लोकप्रिय करण्यात नाही म्हटलं तरी अनिल कपूरचा मोठा हात आहे. मूळ शोशी संबंधित लोक जेव्हा इथे आले, त्यांनी हा शो पाहिला आणि त्यांना जेव्हा जयसिंग राठोड आणि त्यांच्या टीमची कथा आवडली तेव्हाच खरं म्हणजे मला माझ्या कामाचं समाधान मिळालं होतं, असं त्यांनी सांगितलं. इथल्या लोकांची पसंतीही त्यांच्यासाठी तितकीच महत्त्वाची होती. हा शो जेव्हा आला तेव्हा नाही म्हटलं तरी संकल्पनेपासून मांडणीपर्यंत सगळ्यात वेगळेपणा असलेला हा शो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अंमळ उशीरच लागला, असं त्यांचं म्हणणं आहे. कित्येकांनी हा शो पुन्हा पुन्हा पाहिला, ज्यांना उशिरा कळला त्यांनी तो डीव्हीडीवर पाहिला. आणि मग मी जिथे जिथे जायचो तेव्हा आता पुन्हा कधी? अशी विचारणा व्हायची. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहूनच दुसरे पर्व करण्याचा निर्णय पक्का केला होता, असे त्यांनी सांगितले.
या पर्वात अनेक कलाकार आहेत. पण अनुपम खेर यांच्यासारखे जाणते कलाकार नाहीत म्हणताच, अरे पण मी त्यांच्या मुलाला सिकंदरला यात घेतलं आहे.. असं मिश्कीलपणे ते सांगतात. या पर्वात अनेक मराठी चेहरेही आहेत. अमृता खानविलकर, शरद पोंक्षे यांचा उल्लेख निघताच मराठी कलाकारांबद्दल माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे, असंही ते गमतीने सांगतात. पण मराठी कलाकार हे मुळातच रंगभूमीवरचे कलाकार आहेत. ते अन्यत्र कमी बजेटमध्ये खूप मेहनतीने काम करतात. त्यांची मेहनत, त्यांचा सहज अभिनय याचं योग्य चीज व्हायला हवं. ते या शोमध्ये झालं आहे, असं ते विश्वासाने सांगतात. ‘२४’चे दुसरे पर्व हे ‘बायो वॉर’ या संकल्पनेवर आधारित आहे. आत्ताचा शत्रू हा छुपा आहे, व्हायरसचा वापर करून झालेला आहे. एरव्ही आपल्यावर शारीरिक हल्ला होतो, हिंसा होते तेव्हा त्याला प्रत्युत्तर देऊ शकेल, अशी व्यवस्था आपल्याकडे असते. ‘व्हायरस’च्या बाबतीत तसं नाही. त्यामुळे असा हल्ला कोण आणि का करतं, हे दुष्टचक्र किती भयानक आहे हे सगळं यातून खूप व्यापक प्रमाणावर दिसेल, असं अनिल कपूर यांनी सांगितलं. अभिनय देव याही पर्वाचे दिग्दर्शन करतो आहे. त्याच्याशी तर घरोब्याचे नाते झाले आहे. एरव्हीही माझ्याशी जोडल्या गेलेल्या माणसांना मी कधीच सोडत नाही. त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम करत राहायला मला आवडतं, असं त्यांनी सांगितलं. ‘२४’चा मूळ शो करणं हे खूप मोठं स्वप्न आहे, असं सांगणाऱ्या अनिल कपूरना या मालिकेत कधीतरी सोनमचा प्रवेश होईल का?, विचारल्यावर ते सरळ नको म्हणतात. ती या शोत माझीच जागा घेणार म्हणते. त्याशिवाय, ती काम करणार नाही. मला नाही परवडणार ते, असं म्हणत गमतीने सोनमप्रवेशाचा प्रश्न ते बाजूला करतात. ‘२४’ च्या मूळ शोबरोबरच ‘फॅ मिली गाय’ आणि ‘प्रिझन ब्रेक’ अशा दोन अमेरिकन शोचेही हक्क त्यांनी विकत घेतले असून येत्या काळात आणखी ‘जबरदस्त’ काम आपल्या हातून होणार असल्याची ग्वाही अनिल कपूर यांनी दिली आहे.
रेश्मा राईकवार