अमेरिकी सिनेमामध्ये जे जातिवंत तऱ्हेवाईक चित्रकर्ते आहेत, त्यात धाडससातत्य राखण्यामध्ये वेस अ‍ॅण्डरसन हा दिग्दर्शक पटाईत आहे. म्हणजे समांतर जगात एखाद्या चित्रप्रकाराची चलती असताना हा दिग्दर्शक कालबाह्य़ गोष्टींना हात घालण्यास सज्ज होतो. त्यातून आपला खणखणीत सिनेमा बनवतो. त्याच्या चित्रपटांना साहित्याचे काहीसे अस्तर असते आणि सगळी पात्रे तिरकस वागणुकीतून साहित्यातील विनोदी पात्रांना मागे टाकणारी असतात. त्याच्या सिनेमातील व्यक्तिरेखांचे नातेसंबंध जटिल असतात आणि त्यामागच्या कारणांमधील विनोद धारदार असतो.

हायस्कूलमधील शिक्षिकेच्या प्रेमात तिच्या मागे लागणाऱ्या उद्योगपतीला प्रतिद्वंदी ठरवणाऱ्या अष्टपैलू विद्यार्थ्यांचे प्रेमस्वयंवर मांडणारा ‘रशमोर’, एका कुटुंबातील तऱ्हेवाईक व्यक्तींचे संमेलन मांडणारा ‘रॉयल टिननबम’, महाकाय हॉटेलमध्ये काव्य-शास्त्र-विनोद साजरा करणारा ‘ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल’ या चित्रपटांना पाहणे किंवा चांगले कथन साहित्य अनुभवणे यात फरक तसा फार नाही. कारण घटनांतील आकर्षक कल्पना, व्यक्तिरेखांच्या स्मार्ट संवादाची उंची आणि अव्वल कलाकारांची भूमिकांना न्याय देण्याची तडफ यांमुळे अ‍ॅण्डरसनचा चित्रपट सर्वसामान्य चित्रपटांहून कैक हात दूर असतो. त्याच्या ‘द लाइफ अ‍ॅक्वाटिक विथ स्टीव्ह झिसू’ या चित्रपटावर जगप्रसिद्ध समुद्री कादंबरी ‘मोबी डीक’ची छाया आहे. मात्र समुद्रात जहाजावर घडणाऱ्या घटनांमधील विचित्ररस खास अ‍ॅण्डरसनकृत आहे. भारतामध्ये येऊन त्याने ‘दार्जिलिंग लिमिटेड’ नावाचे जे सिनेरत्न बनविले होते, ते स्लमडॉग मिलिऑनेरच्या लाटेत दुर्लक्षित राहिले. तरी मुनराईझ किंग्डम आणि ग्र्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल या आपल्या शैलीशी जराही फारकत न घेणारे सिनेमेज त्याने बनविले. या दिग्दर्शकाचा जगभरात असलेला मोठा चाहता वर्ग तो कोणते नवे सिनेधाडस करतो, याकडे चातक नजरेने वाट पाहत असतो. यंदा त्यांना ‘आयल ऑफ डॉग्ज’च्या निमित्ताने स्टॉप मोशन अ‍ॅनिमेशन सिनेमाचा जपानी भूमीवरचा प्रयोग पाहायला मिळणार आहे. ‘आयल ऑफ डॉग्ज’ हा सर्वार्थाने संपूर्ण अमेरिकी सिनेमा असला तरी तो पूर्णपणे घडतो भविष्यातील जपानमध्ये. हा चित्रपट बनविण्यातील धाडसांच्या बाबी अनेक आहेत. पहिली बाब जपानची ओळख ही मांजरप्रेमींचा देश म्हणून आहे. हारुकी मुराकामी ते कैक लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांपासून ते किटानो-मिकेच्या सिनेमांमध्ये मांजर उपस्थित असते. अ‍ॅण्डरसनने भविष्यातील जपानमध्ये मेगासाकी नावाचे शहर तयार केले आहे, जिथले मर्जारप्रेम श्वानांच्या अस्तित्वावर गदा आणणारे असल्याचे मांडले आहे. जगातील सर्वोत्तम अ‍ॅनिमेटर्स असलेल्या देशात जाऊन स्टॉप मोशन अ‍ॅनिमेशन या काहीशा अवघड तंत्रात अ‍ॅण्डरसनने सिनेमा बनविला आहे. हे जपानी सिनेमांना आदरांजली देणारे असल्याचे उच्चरवात जाहीर केले तरी सोपे नाही. शेवटचे धाडस म्हणजे येथील व्यक्तिरेखा आणि श्वानांची संख्या अधिक असल्याने श्वानरेखा अ‍ॅण्डरसनच्या चित्रपटांतील तऱ्हेवाईक तत्त्वज्ञानाला आणखी पुढे नेण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे इथल्या सर्व श्वानांना जपानमध्ये जन्म घेतला तरी जपानी भाषा कळत नाही. ती अस्खलित इंग्रजीमध्ये काव्य-शास्त्र-विनोद करत राहतात.

इथली गोष्ट सरधोपट आहे. मेगासाकी शहरात भटक्या आणि घरक्या कुत्र्यांची पैदास मोठी झालेली असते. त्यातच ‘डॉग फ्लू’ नावाच्या भयंकर आजाराने शहरातील नागरिकांची विभागणी बहुसंख्य ‘श्वानविरोधी’ आणि अल्पसंख्य ‘श्वानप्रेमीं’मध्ये झालेली असते. भ्रष्ट-क्रूरोत्तम राजकारणी कोबायाशी श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय शोधतो. शहरातील सर्वच श्वानांना कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेटावर सोडून देण्याचा फतवा निघतो. आपल्या दत्तक पुतण्याचा संरक्षक कुत्रा तो तेथे पहिल्यांदा पोहोचवतो. त्या कचराबेटावर काहीच महिन्यांत आजारी, जर्जर आणि मालकाला पारखे झालेल्या श्वानांचे विश्व तयार होते.

उपास किंवा कदान्न आणि माया यांची वानवा असलेल्या या कचराबेटावर पळविलेल्या विमानातून अटारी नावाचा एक बारा वर्षांचा मुलगा दाखल होतो. हा कोबायाशीचा दत्तक पुतण्याच असतो. कचराबेटावरून आपल्या कुत्र्याला शोधण्यासाठी आलेला असल्याने चर्चिल आणि चौकस श्वानांचा एक ताफा त्याला या शोधात मदत करण्यासाठी पुढे येतो. कोबायाशी इथे आपल्या श्वानविरोधी प्रचारामध्ये रंगलेला असतानाच श्वानप्रेमींचा गट कोबायाशीने कुत्र्यांबाबत केलेल्या अपप्रचाराचे भांडे फोडतात. कचराबेटावर श्वानसंहार करण्याच्या त्याच्या योजनेला हाणून पाडण्यासाठी सज्ज होतात.

श्वानतिरस्कार आणि प्रेमाच्या आज गहिऱ्या झालेल्या मात्र आदिमकालापासून असलेल्या संघर्षांला अ‍ॅण्डरसनने अ‍ॅनिमेशनद्वारे रेखाटले आहे. ते करताना लोकशाहीचा पुरस्कार करणारे श्वान आणि हुकूमशाहीचा अंगीकार करणारा मानव दाखवून गंमत उडवून दिली आहे. बिल मरे, ब्रायन क्रॅन्स्टन, फ्रान्सिस मॅकडरमॉण्ड, एडवर्ड नॉर्टन, स्कारलेट जोहान्सन या हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील दिग्गजांसोबत कित्येक मान्यवरांचा यातील व्यक्तिरेखांना आवाज आहे.

वितरकांना उशिरा का होईना, पण आलेल्या शहाणपणामुळे आपल्याकडे ‘आयल ऑफ डॉग्ज’ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. ब्लॉकबस्टर अ‍ॅनिमेशनच्या धारणेतून त्याचा आस्वाद घेता येणार नाही. मात्र अ‍ॅण्डरसनच्या सिनेतत्त्वज्ञानाची आधी ओळख करून घेतल्यास या श्वानीमेशनमधून मिळणाऱ्या आनंदाची मात्रा अधिक असेल.