मराठीतही चित्रपट होण्याची अपेक्षा
मराठी चित्रपटांची वाहिनी अशी ओळख असलेल्या ‘झी टॉकीज’वरून जगभरातील लोकप्रिय अ‍ॅनिमेशन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. येत्या २९ मेपासून या चित्रपटांचे प्रसारण केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट मराठीतून असणार आहेत.
गेल्या वर्षीही झी टॉकीजवरून अ‍ॅनिमेशन चित्रपट सादर करण्यात आले होते. त्याला प्रेक्षकांचा विशेषत: लहान मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही गाजलेले काही अ‍ॅनिमेशन चित्रपट दाखविण्याचे आम्ही ठरविले असल्याचे झी टॉकीजचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले. २९ मेपासून दररोज सकाळी नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या चित्रपटांमध्ये कुंग फू पांडा, मादागास्कर, हाऊ टु ट्रेन युवर ड्रॅगन, रॅन्गो आदी गाजलेल्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांचा समावेश आहे.
या निमित्ताने मराठीतही अ‍ॅनिमेशन चित्रपटांचा प्रयत्न व्हावा आणि त्याची निर्मिती करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या चित्रपटांच्या प्रसारणामागचा उद्देश आहे. असे चित्रपट मराठीत तयार झाले तर झी टॉकीजकडून त्यांचे स्वागत होईल, असेही जानवलेकर म्हणाले.