डिसेंबर महिन्याची सुरुवात खरं तर दोन महत्त्वाच्या चित्रपटांनी व्हायची होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेला चित्रपट तर दुसरा मराठी जनांचे लक्ष ज्याकडे लागून राहिले होते तो अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला ‘देवा’ हा चित्रपटही रणवीर-दीपिकाच्या चित्रपटाबरोबर प्रदर्शित होणार होता. मात्र ‘पद्मावती’वरून सेन्सॉर बोर्डाचे फासे फिरले आणि सेन्सॉरच्या नव्या नियमाची कात्री ‘देवा’लाही लागली. अखेर, या आठवडय़ात ‘पद्मावती’ नाही तर थेट ‘भाई’च्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाबरोबर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. पण हिंदीची कुठल्याही प्रकारची स्पर्धा किंवा दडपण मनावर न घेता आपण आपला चित्रपट प्रदर्शित करतो आहोत, असा विश्वास अंकुशने व्यक्त केला.

‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’, ‘गुरू’, ‘ती सध्या काय करते’ असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आणि दर चित्रपटाबरोबर वेगळी भूमिका, व्यक्तिरेखा घेऊन येणारा अंकुश ‘देवा- एक अतरंगी’ या चित्रपटात नावाप्रमाणेच अतरंगी लुकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली नल्लपा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाचे असून हा चित्रपट ‘चार्ली’ या हिट मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अर्थात, हा रिमेक नाही कारण तो पूर्णपणे मराठी मातीतला वाटावा यासाठी त्याच्या मूळ कथेला धक्का न लावता मराठी संस्कृती, भाषा, सण, इथले लोक या सगळ्यांचा विचार करून ही कथा लिहिण्यात आली आहे, असं अंकुशने सांगितलं. ‘देवा’ या चित्रपटाचा प्रस्ताव दिग्दर्शक मुरली नल्लपा यांनी माझ्याकडे आणला. मुळात, चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे त्यामुळे ती इथल्या प्रेक्षकांना त्यांच्या पद्धतीने दाखवायला हवी, असं मनात आलं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करताना मुळात आम्ही कथा नव्याने लिहिण्यावर भर दिला, असं तो म्हणतो. अश्विनी शंडेने चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. पहिले सहा महिने केवळ कथालेखनासाठीच घेतल्याचे त्याने सांगितले.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘देवा’च्या कथेला खूप वेगवेगळे आणि रंगीबेरंगी पदर आहेत. चेहऱ्यावर आनंद आणणारा असा हा चित्रपट असल्याने कथेत जसे वेगवेगळे मौसम आलेत त्या पद्धतीने त्या त्या ऋतूत वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण केल्याचे तो सांगतो. एक यशस्वी अभिनेता म्हणून सतत नव्या चित्रपटागणिक वेगळी कथा-व्यक्तिरेखा असण्याचं दडपण मनावर असतं का? यावर ते दडपण म्हणून न घेता आव्हान म्हणून त्याचा विचार सुरू केला असल्याचे अंकुशने स्पष्ट केले. ‘आता त्याची भीती वाटत नाही. दरवेळी मी एक व्यक्तिरेखा घेतो, त्याचे बारकावे शोधतो, ती माझ्या पद्धतीने साकारतो. एखाद्या नाटकाच्या मांडणीला आपण जसा न्याय देतो त्याच पद्धतीने मी आता चित्रपटाचा विचार करतो. नाटकात जसं मूळ संहिता वाचन, तालीम ते प्रत्यक्ष नाटक असा प्रवास असतो. त्याच प्रकारे चित्रपटातही अगदी कथालेखनाच्या प्रक्रियेपासून ते मग वितरण, प्रसिद्धी आणि प्रदर्शनापर्यंत मी त्या चित्रपटाच्या प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असतो’, असं तो सांगतो. अंकुशने अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही केलं आहे. ‘साडेमाडे तीन’ असेल किंवा ‘झक्कास’ असेल दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या अंकुशसाठी चित्रपटाच्या प्रत्येक प्रक्रियेशी जोडलेलं असणं नवीन नाही. मात्र अभिनेता म्हणून काम करताना आपण दिग्दर्शकावर गारुड करण्याचा प्रयत्न करत नाही. तर त्याच्या बरोबरीने बसून एक कलाकार म्हणूनच त्या सगळ्या प्रक्रियेत सहभाग घेतो आणि त्याचा आपल्याला खूप फायदाही होतो, असं तो सांगतो. ‘देवा’च्या बाबतीत म्हणायचं तर मी एखाद्याच ठिकाणी मला काही सुचवावंसं वाटलं तर दिग्दर्शकाशी बोलायचो. पण चित्रपटाचं संगीत असेल तर त्या गाण्याच्या लेखनापासून मी तिथे हजर होतो. अमितराजने ‘देवा’चं संगीत केलं आहे. गुरू ठाकूर, अश्विनीने गाणी लिहिली आहेत. म्हणजे जेव्हा एखादा गायक चित्रपटातलं गाणं गातो आहे तेव्हा तो माझ्यासाठी ते गातो आहे हे मी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं गाणं ऐकताना मला माझी व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहते. त्या गाण्याच्या वेळी ती व्यक्तिरेखा कशा प्रकारे व्यक्त होईल किंवा दुसऱ्या कलाकाराचा शॉट असताना अमुक एका प्रसंगात माझी व्यक्तिरेखा कशी प्रतिसाद देईल हे सगळं त्या निरीक्षणातून उभं राहतं आणि अंतिमत: त्याचा फायदा चित्रपटाला होतो, असं तो म्हणतो.

या चित्रपटात अंकुशबरोबर तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, पॅडी कांबळे, वैभव मांगलेकर अशा नव्याजुन्या कलाकारांनी काम केलं आहे. मात्र आणखी एका व्यक्तीची या चित्रपटाबरोबर आठवण जोडली गेली आहे. अभिनेत्री रिमा लागू यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. त्यांची आठवण आणि शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितल्याशिवाय त्याला राहवलं नाही. रिमा लागू या सगळ्यांच्याच ‘आई’ होत्या. या चित्रपटात त्यांची खूप छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका आहे. त्या आजारी होत्या शेवटच्या काही दिवसांत.. मात्र त्याआधी त्यांची भेट झाली होती. डबिंगच्या वेळी त्या भेटल्या होत्या. आणि चित्रपटात जसा त्यांचा एक संवाद आहे त्याच पद्धतीने माझ्या डोक्यावर हात ठेवून ‘चांगलं काम करतोस तू.. असाच चांगल्या चित्रपटातून काम करत राहा’, असा आशीर्वाद त्यांनी दिला. आणि त्यानंतर अगदी दहा-पंधरा दिवसांतच त्यांच्या निधनाची बातमी आली. या चित्रपटाबरोबरची त्यांची आठवण कायम राहील, असं अंकुश म्हणतो.

‘पद्मावती’ रखडला आणि मग सेन्सॉरच्या नियमामुळे चित्रपटाला प्रदर्शनासाठी तीन आठवडे वाट पाहावी लागली. मात्र या घटनेचाही आम्ही सकारात्मकच विचार केला, असं तो म्हणतो. आम्ही खरं तर आधीच चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. पण चित्रपट पुढे गेल्यामुळे आणखी एक महिना मिळाला त्याचाही वापर आम्ही प्रसिद्धीसाठी करून घेतला, असं तो सांगतो. आम्ही चित्रपट चांगला व्हावा यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तो लोकांना आवडणार नाही, ही शक्यताच नाही. आता तो किती चालेल वगैरे गणितं वेगळी आहेत. त्याचा विचार करणार नाही. मी या चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रि येचा आनंद घेतला आहे, असं सांगणारा अंकुश सध्या तरी चांगल्या चांगल्या भूमिका करणं हेच आपलं आत्ताचं ध्येय असल्याचं स्पष्ट करतो. त्याचा हा अतरंगी ‘देवा’ अवतार लोकांना आवडला तर तिथेच न थांबता आणखी नव्या भूमिकेचा शोध त्याने सुरू केला असेल यात शंका नाही!