हॉलीवुड विरुद्ध बॉलीवुड असे एक वेगळेच द्वंद्व सध्या पाहायला मिळते आहे. हल्ली भारतात प्रदर्शित होणारा प्रत्येक हॉलीवुडपट कणाकणाने का होईना पण प्रेक्षकांना स्वत:कडे वळवण्यात यशस्वी ठरत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनाबेले क्रिएशन’ या चित्रपटानेही भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. पहिल्याच दिवशी ४.५० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने आठवडय़ाअंती १६.२५ कोटींचा गल्ला जमवला. त्याच दरम्यान अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘बरेली की बर्फी’ हा बॉलीवुडपटही प्रदर्शित झाला होता. परंतु, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली. पहिल्या दिवशी २.४२ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाला आठवडय़ाअंती ११.३० कोटींपर्यंतच मजल मारता आली. दोन्ही चित्रपटांची तुलना करता ‘अ‍ॅनाबेले क्रिएशन’ हा भयपट असल्याने त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. फक्त २१ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच हा चित्रपट होता. तर ‘बरेली की बर्फी’ हा कौटुंबिक चित्रपट होता. या पाश्र्वभूमीवर विचार करता हिंदी चित्रपटाने जास्त प्रेक्षक जमवणे अपेक्षित होते. पण सध्या हॉलीवुडपटच बॉलीवुडपटांवर भारी पडताना दिसून येत आहेत. चित्रपट तज्ञांच्या मते बॉलीवुडपटांनी मोठय़ा प्रमाणावर सुरु केलेली उचलेगिरी, आणि मराठी व दक्षिण भारतीय चित्रपटांचा वाढता प्रभाव याचा मोठा परिणाम हिंदी सिनेसृष्टीच्या व्यवसायावर होत आहे. चित्रपटांच्या विषयांमध्ये असलेले वैविध्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वास्तव वाटणारी अ‍ॅक्शनदृश्ये आणि जबरदस्त दिग्दर्शन याद्वारे हॉलीवुडपटांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनावर एक मोहिनी घातली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांची तुलना सध्या पाश्चात्य चित्रपटांशी केली जात आहे. तसेच आजवर फक्त इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणारे हे चित्रपट प्रादेशिक भाषेत डब केल्यामुळे इंग्रजी भाषा न समजणारा प्रेक्षकवर्गही हॉलीवुडपटांकडे वळू लागला आहे. याचा थेट परिणाम बॉलीवुडपटांच्या व्यवसायावर जाणवू लागला आहे.