दिग्दर्शक शंकर आपल्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. कालच त्यांनी या चित्रपटासंदर्भातली एक महत्त्वाची घोषणा केली होती. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यात प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पण आता या चित्रपटामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे.

दिग्दर्शक शंकर यांनी काल आपल्या ‘अन्नियन’ या चित्रपटात बॉलिवूड स्टार रणवीर सिंग असल्याचं जाहीर केलं होतं. यामुळे निर्माते व्ही. रविचंद्रन यांनी शंकर हे बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. रविचंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, निर्माता म्हणून ‘अन्नियन’च्या कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे आहेत.

ते म्हणतात, “मला हे वाचून धक्का बसला की ‘अन्नियन’च्या कथेवर आधारित हिंदी चित्रपट तुम्ही करत आहात. तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहित आहे की ‘अन्नियन’चा निर्माता मी आहे. लेखकाकडून ही कथा पूर्ण पैसे देऊन मी विकत घेतली आहे आणि त्यासाठीची सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. या कथेचा पूर्णपणे मी मालक आहे. त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय या कथेवर आधारित चित्रपट बनवणं अथवा कथेची कॉपी करणं हे सगळं बेकायदेशीर आहे.” रविचंद्रन यांनी शंकर यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात या गोष्टी समाविष्ट आहेत.

रविचंद्रन यांनी शंकर यांना ‘अन्नियन’साठी संधी दिल्याने ते त्यांच्यावर आलेल्या अपयशातून बाहेर पडल्याचा दावाही रविशंकर यांनी केला आहे. ‘बॉयज्’ नावाच्या एका चित्रपटामुळे शंकर यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. रविचंद्रन म्हणतात, “तुम्ही ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरलात आणि मला न सांगताच माझ्या यशस्वी चित्रपटाचं श्रेय लाटायला निघाला आहात आणि त्याचा हिंदी रिमेकही करत आहात. मला कायम वाटायचं की तुम्ही तत्वनिष्ठ आहात आणि म्हणूनच मला आश्चर्य वाटत आहे की अशा बेकायदेशीर गोष्टी करण्यापर्यंतच्या खालच्या थराला तुम्ही कसे जाऊ शकलात?”

रविचंद्रन यांनी शंकर यांना तात्काळ या चित्रपटासंदर्भातलं काम थांबवण्यास सांगितलं आहे.
कालच शंकर यांनी ही घोषणा केली होती की, ‘अन्नियन’, जो ‘अपरिचित’ या नावाने हिंदीमध्ये डब झाला होता आणि त्याला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादही मिळाला होता, त्या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे.