बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला. अनेक कलाकारांनी घराणेशाहीवर वक्तव्य केले. काहींनी त्यांचे बॉलिवूडमधील अनुभव सांगितले तर काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले. तसेच नेटकऱ्यांनी दिग्दर्शक, निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना ‘नेपोटीझम प्रमोटर’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. आता अभिनेते अन्नू कपूर यांनी घराणेशाही वादावर वक्तव्य केले आहे.
नुकतीच अन्नू कपूर यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना सध्या सुरु असलेल्या घराणेशाही या वादावर त्यांचे मत विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, ‘जर घराणेशाही असतं तर आज सनी देओल, अमिताभ बच्चन, वासु भगनानी, हरी बावेजा यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांची मुले टॉम क्रूज सारखी स्टार झाली असती’ असे म्हटले.
‘अशी अनेक लोकं आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. खरे बोलायचे झाले तर घराणेशाही सारखे काही नसते. जरी तुम्ही एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलात तरी सुद्धा तुमच्यामध्ये टॅलेंट हवे’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
‘एखाद्या डॉक्टर किंवा आर्किटेक्टचा मुलगा डॉक्टर किंवा आर्किटेक्ट होऊ शकतो. पण एखाद्या फिल्म स्टारने त्याच्या मुलाला किंवा मुलीला इंडस्ट्रीमध्ये लाँच केले तर आपण नेपोटीझमच्या नावाने का रडतो? प्रत्येक मुलाचे आई-वडिल त्याला योग्य ते मार्गदर्शन देत त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. हे चुकीचे कसे असू शकते?’ असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:23 pm