अभिनेता, सूत्रसंचालक, निवेदक अशा भूमिकेत वावरणारे अन्नू कपूर दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्यावर ‘फोर्टी प्लस’ हा नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही वर्षांपूर्वी कपूर यांनी दूरदर्शनसाठी ‘कबीर’ व ‘परमवीर चक्र’ या मालिका केल्या होत्या. अन्नू कपूर यांचा हा नवा कार्यक्रम ३१ ऑगस्टपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरू होत आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ८ ते ८.३० या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
वयाची चाळिशी पार केलेल्या आणि जीवनातील अडचणींना तोंड देत यशस्वी झालेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या कार्यक्रमात बोलते केले जाणार आहे. त्यांचा संघर्ष, अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता येणार आहेत. २४ ऑगस्टपासून दररोज सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री दहा वाजता ‘बेटी का फर्ज’ ही नवी मालिका सुरू होत आहे. १७ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी रात्री नऊ वाजता ‘दिल को आज फिर जीने की तमन्ना है’ ही नवी मालिकाही सुरू झाली आहे.
किरण जुनेजा संचालित ‘कोशिसोंसे कामयाबी तक’ हा नवीन कार्यक्रमही सुरू झाला असून तो दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता प्रसारित होणार आहे. विविध क्षेत्रांतील सेलिब्रेटींशी मारलेल्या गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. स्वातंत्र्य संग्राम व स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष, वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढय़ातील योगदान, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांची कथा ‘रणभेरी’तून उलगडली जाणार आहे. हा कार्यक्रम दर शनिवार व रविवारी रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात झालेल्या एका पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली.