सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी मिळतच होती आणि आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. याची सुरुवात संगीत कलाविश्वात मोठं नाव असलेले गायक-गीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने!

अनु मलिक ३ आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यावेळी अनु मलिक यांनी सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर ‘आम्ही ढोलकर’ हे मराठी गाणंही त्यांनी गायलं. ‘आग लगा दी’ असं म्हणून स्पर्धकांचं कौतुक करणाऱ्या अनु मलिक यांनी हास्यजत्रेच्या स्पर्धकांचं मराठमोळं कौतुक केलं आहे.

प्राजक्ता माळी या शोची सुत्रसंचालक आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर या कार्यक्रमाचा परिक्षक आहेत. तर विशाखा सुभेदार, समीर चौगुले, पंडरीनाथ कांबळे, वनिता खरात, प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे यांनी त्यांच्या कॉमिक नाटकांद्वारे आणि अभिनयांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतात.