भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड ब्युटी अनुष्का शर्मा त्यांच्या लग्नाच्या दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांच्या दिल्ली आणि मुंबईमधील रिसेप्शनचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच आनंदाच्या क्षणात अनुष्कासाठी अजून एक गोड बातमी आली आहे. अनुष्काला ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. याआधी २०१५ मध्ये पेटाने अनुष्काला हॉटेस्ट वेजीटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कार दिला होता.

अनुष्का प्राण्यांच्या समस्यांवर सातत्याने काम करताना दिसते. ती सोशल मीडियाच्या मदतीने याबद्दल जागरुकताही निर्माण करते. घोड्यांना योग्य आहार दिला जात नसून त्यांच्याकडून अतिरिक्त काम करुन घेतलं जातं, ज्यामुळे ते जखमी होतात. यामुळेच मुंबईत सुरू असणाऱ्या घोडेस्वारीचाही अनुष्काने विरोध केला होता.

https://www.instagram.com/p/BTWpwK-jk1F/

‘पीके’, ‘जब तक है जान’, ‘ऐ दिल है मुश्किल’ यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अनुष्का शुद्ध शाकाहारी आहे. पेटाचे सेलिब्रिटी पब्लिक रिलेशन असोसिएट डायरेक्टर सचिन बांगेला यांनी म्हटले की, ‘पेटा सर्वांनाच शाकाहारी आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला देत असते. तुम्ही कोणता आहार करता हे फार महत्त्वाचे असते. सुदृढ आरोग्यासाठी अधिकाधिक भाजीपाला खायला हवा.’ पुढे बोलताना बांगेरा म्हणतात की, ‘अनुष्का नेहमीच शाकाहारी आहार घेत असून, इतरांनाही शाकाहारासाठी प्रवृत्त करीत आली आहे.’

काही दिवसांपूर्वीच फोर्ब्सने ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १००’ची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनुष्काला दुसरे स्थान देण्यात आले होते. त्यामुळे २०१७ हे वर्ष अनुष्काला खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरले असेच म्हणावे लागेल.