गेल्या काही वर्षांमध्ये स्टँडअप कॉमेडी प्रकाराला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. वेब विश्वातही मनोरंजनाची ही खेळी बरीच यशस्वी ठरत आहे. अशा या विश्वातील एक प्रसिद्ध नालव म्हणजे कुणान काम्रा अडचणीत आला आहे. वडोदऱ्यातील एम.एस. विद्यापीठात कुणाल काम्राच्या कॉमेडी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, त्यानंतर मात्र हा शो रद्द करण्यात आला.

११ ऑगस्टला सी.सी. मेहता सभागृहाध्ये हा कार्यक्रम होणार होता. पण, त्यापूर्वीच विद्यापीठाच्या उप कुलगुरूंना ११ माजी विद्यार्थ्यांकडून कुणाल काम्रा सादर करत असणाऱ्या कार्यक्रमातील काही भाग हा देशद्रोही असल्याचं सांगण्यात आलं. ज्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. ‘शनिवारी रात्रीच आम्ही काम्रा यांना कार्यक्रम रद्द झाल्याचं तोंडी कळवलं आहे. त्यांच्या कार्यक्रमातील काही गोष्टी या वादग्रस्त आणि देशद्रोही असल्याचं आम्हाला कळल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल’, असं सीसी मेहता सभागृहाचे समन्वयक राकेश मोदी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना स्पष्ट केलं.

वाचा : भारतीय फुटबॉल महासंघाच्या बैठकीत ऑलिम्पिक संघटनेचा निषेध

विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी एका हा कार्यक्रम रद्द करण्याविषयीची विचारणा करण्याऱ्या ई- मेलमध्ये त्याविषयीची काही कारणंही नमूद केली आहेत. देशाच्या विरोधात वक्तव्य करत कार्यक्रमाचं सादरीकरण करणाऱ्या विनोदवीराच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन आपण कोणता संदेश देऊ इच्छितो? त्याने राष्ट्रगीताची नक्कल केली होती, त्याशिवाय तुकडे तुकडे गॅंगलाही त्याने पाठिंबा दिला होता. आतापर्यंत देशात बऱ्याच विद्यापीठांनी त्याच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. तर मग, आपण त्याला इथे प्रवेशच का देतोय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या सर्व चर्चांनंतर कुणालने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली ज्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.