देशामध्ये #MeToo मोहिमेच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता गायिका नेहा कक्करवर निशाणा साधला आहे. #MeToo मोहिमेअंतर्गंत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. मात्र इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहासोबत एका स्पर्धकाने गैरवर्तन केल्यानंतरही ती शांत कशी काय बसली? तसंच MeToo मोहिमेअंतर्गत अनु मलिक यांच्यावर महिलांनी आरोप केलेले असतानाही नेहा त्यांच्यासोबत काम कशी काय करु शकते? असे अनेक प्रश्न तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केले आहेत.

“मी सोना मोहोपात्रा आणि तिच्या सारख्याच निर्भीड आणि बेधडकपणे स्वत:च मत मांडणाऱ्या महिलांसाठी मला उभं राहून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. या महिलांनी अनु मलिक यांच्याविरुद्ध त्यांना जे काही वाटत होतं ते न घाबरता साऱ्यांसमोर सांगितलं. परंतु मला एका गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं की सोनी सारखी वाहिनी अनु मलिक यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये परिक्षक म्हणून कसं काय निवडतात. या व्यक्तीविरोधात अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार केली आहे. नैतिकतेपेक्षा कार्यक्रमाचा टीआरपी इतका महत्त्वाचा आहे का?, असं तनुश्री म्हणाली.

पुढे तिने ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर नेहा कक्करसोबत जो प्रकार घडला त्यावरही तिचं मत मांडलं. ”इंडियन आयडॉल’च्या सेटवर एका स्पर्धकाने चक्क नेहाला kiss केलं. त्यावेळी तिला जाणवलं असेल की अशी घटना घडल्यावर नेमकं काय होतं. मात्र तरी ती शांत राहिली. अनु मलिकसोबत काम करतानाही तिने मौन बाळगलं आणि आताही ती तेच करते. अनु मलिकसारख्या व्यक्तीसोबत या शोमध्ये काम करताना तिला काही वाटलं नाही तसंच या प्रसंगाच्यावेळी देखील ती गप्प राहिली”.

दरम्यान, ‘इंडियन आयडॉलचं ११’ वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये गायक,संगीतकार अनू मलिक या शो मध्ये परिक्षक म्हणून दिसणार आहेत. परंतु त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून त्यांना दहाव्या पर्वात परीक्षकपदावरून हटवण्यात आले होते. ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करून कदाचित चॅनल पुन्हा एकदा त्यांना परीक्षक म्हणून बोलावणार आहे असं समजतंय. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.