बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर #MeToo मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतर अनू यांना ‘इंडियन आयडॉल १०’च्या परीक्षकपदावरून हटवण्यात आले होते. आता यशराज फिल्म स्टूडिओचे दरवाजे देखील अनू मलिक यांच्यासाठी बंद करण्यात आले आहेत.

डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या माहितीनुसार अनू मलिक यांची यशराज फिल्म स्टूडिओमधील प्रवेशावर बंदी आणण्यात आली आहे. यशराज फिल्म स्टूडिओ लैंगिक शोषणाचे अरोप असणाऱ्या व्यक्तिंच्या नेहमीच विरोधात असतो. गेल्या वर्षी स्टूडिओचे वरिष्ठ अधिकारी आशीष पटेल यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर स्टूडिओने त्यांना देखील पदावरुन हटवले. याआधी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकरांवर देखील #MeToo मोहिमे अंतर्गत लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये आलोक नाथ आणि साजीद खान यांचा समावेश आहे आणि यश राज स्टूडिओने त्यांच्या प्रवेशावर देखील बंदी घातली आहे.

अनू मलिक पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल’ पर्व ११च्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. ‘डी.एन.ए’ च्या वृत्तानुसार, अनू मलिक व चॅनेलमध्ये चर्चा सुरु असून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर अनू मलिक पुन्हा परीक्षक म्हणून दिसणार आहेत.

अनू मलिक यांच्यावर प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसेच आणखी दोन महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे. १९९०मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.