प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. १९९०मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये अनू मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफीसुद्धा मागितली पण नंतर जेव्हा निधी गोळा करण्याच्या कामानिमित्त मी त्यांच्या घरी गेले तेव्हा धक्कादायक अनुभव आल्याचं तिने सांगितलं.

‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पीडित महिलेने सर्व हकीकत सांगितली. ‘त्यांच्या घरी गेले असता सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले. त्यावेळी त्यांच्या घरी कोणीच नव्हतं. माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत त्यांनी माझा स्कर्ट वर केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला पण मला ते शक्य झालं नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवलं पण या प्रसंगाबाबत कोणाला काहीच न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली होती. नंतर मला घरी सोडताना त्यांनी पुन्हा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला,’ असं त्या महिलेनं सांगितलं.

अनू मलिकने स्टुडिओमध्ये असभ्य वर्तन केल्याचा आरोप आणखी एका महिलेने केला आहे. याआधीही मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान अनू मलिकने सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत.

#MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिला त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडत असून यामध्ये कलाविश्वातील मोठमोठी नावं समोर येत आहेत. नाना पाटेकर, आलोक नाथ, दिग्दर्शक विकास बहल, रजत कपूर, साजिद खान, कैलाश खेर यांसारख्या कलाकारांवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत.