#MeToo या मोहिमेअंतर्गत झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर संगीतकार-गायक अनु मलिकने ‘इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वातून परीक्षकपदावरून स्वत:हून माघार घेतली आहे. गायिका सोना मोहपात्राने अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतरही रिअॅलिटी शोचे परीक्षकपद अनु मलिकला दिल्याने सोशल मीडियावरून तिने वाहिनीवर जळजळीत टीका केली होती. आता अनु मलिकने स्वत:हून माघार घेतल्याने, ‘हा लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या महिलांचा विजय आहे’, अशी प्रतिक्रिया सोनाने दिली आहे.

“सोनी वाहिनीने अनु मलिकला परीक्षकपदावरून हटवण्यासाठी फार वेळ घेतला. पण अखेर त्यांनीच माघार घेतल्याने मला आनंद झाला. हा लढा संपूर्ण देशासाठी होता. राष्ट्रीय वाहिनीवर अशाप्रकारे त्यांनी झळकणं अनेक महिलांना मान्य नव्हतं. यामुळे इतरांनाही चुकीचा संदेश मिळत होता. मी न्यायासाठी लढत होते. अनु मलिक यांनी वाईट वागणूक दिलेल्या प्रत्येक महिलेचा हा विजय आहे”, असं सोना म्हणाली.

काय आहे प्रकरण?
2018 मध्ये गायिका सोना मोहपात्राने अनु मलिकवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांनंतर सोनी वाहिनीने त्यांना ‘इंडियन आयडॉल’च्या दहाव्या पर्वातून परीक्षकपदावरून काढून टाकले होते. सोनाने केलेल्या आरोपांनंतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनीही तिची साथ दिली. या दोन गायिकांनीही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले.

‘इंडियन आयडॉन’च्या अकराव्या पर्वात परीक्षक म्हणून जेव्हा अनु मलिक परतला, तेव्हा सोनाने सोशल मीडियाद्वारे पुन्हा मोहिम सुरु केली. अनु मलिकविरोधी तिच्या मोहिमेला सोशल मीडियावर अनेक महिलांचा पाठिंबा मिळाला. अखेर गुरुवारी अनु मलिकने स्वत:तून माघार घेतली व शो सोडण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना सोनाने खुलं पत्र लिहित याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली होती. सोनाच्या पत्रानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने सोनी टीव्हीला नोटीस बजावली. नोटिशीत त्यांनी सोनाच्या पत्राचा उल्लेख करत वाहिनीला स्पष्टीकरण देण्यास सांगितले.

परीक्षकपदावरून माघार घेतल्यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनु मलिक म्हणाला, “मी फक्त तीन आठवड्यांचा ब्रेक घेतला आहे. माझं निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर मी पुन्हा येईन.”