करोनाचे संक्रमण वाढल्यामुळे लॉकडाउनचा काळ देखील वाढत चालला आहे. वाढत्या लॉकडाउनमुळे देशवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहे. ही मंडळी आपल्या घरी जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे हाल सरकारला दिसत नाही का? असा प्रश्न बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी विचारला आहे.

“मला आशा आहे की भारत सरकार गेले ४५ दिवस टीव्ही पाहात असेल. गरीब गरोदर महिला, लहान मुलं, कामगार अन्न आणि पाण्याशिवाय कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. कृपया टीव्हीवर नटून थटून येण्यापूर्वी त्यांचा देखील विचार करावा. या मंडळींची मदत करण्यात सरकारला अपयश आलं आहे.” अशा आशयाचं ट्विट अनुभव सिन्हा यांनी केलं आहे.

अनुभव सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते नेहमीच व्यक्त होत असतात. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या मुद्दयावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचं ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.