भारतात सध्या ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयका’वरुन जोरदार वाद-विवाद सुरु आहेत. अलिकडेच राज्यसभेत ११७ विरुद्ध ९२च्या फरकाने हे विधेयक मंजूर झाले. दरम्यान ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकारावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांचे समर्थन केले. जे लोक या विरोधात आवाज उठवत नाही त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अनुभव सिन्हा

“लहानपणी जेव्हा आई आम्हाला म्हणायची की, प्रगती पुस्तक कधी मिळणार? तेव्हा आम्ही गप्प बसायचो. कारण प्रगती पुस्तक आमच्या दफ्तरात (बॅग) पडलेलं असायचं, पण दाखवण्यासारख नसायचं. जेव्हा आम्ही काहीच बोलयाचो नाही. तेव्हा आई म्हणायची, ‘अब मुँह में दही काहे जम गया?’ आज मी समाजाचे आदर्श असणाऱ्या लोकांना विचारतोय मुँह में दही काहे जमा है रे?”

यापूर्वी विकी कौशल, पूजा भट्ट, परिणीती चोप्रा, रेणूका शहाणे, जावेद जाफरी, हूमा खुरेशी, स्वरा भास्कर या बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करुन जामिया हिंसाचार प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.