‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (FTII) संचालकपदी गझल व भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार जलोटा यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर ‘एफटीआयआय सोसायटी’वर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डॅन्झोप्पा, अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे. ‘एफटीआयआय सोसायटी’ आणि नियामक मंडळ तसेच शैक्षणिक परिषदेच्या नियुक्त्या गेल्या वर्षभरापासून रखडल्या होत्या. ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती झाल्यानंतर अकरा महिन्यांनी या नियुक्त्या झाल्या आहेत.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माता विदू विनोद चोप्रा, अभिनेते सतीश कौशिक, दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी, येसुदास, चित्रपट अभ्यासक प्रा. अर्चना राकेश सिंग यांचीही सोसायटी सदस्यपदी निवड झाली आहे. अनुपम खेर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळांची स्थापना करण्यात आली नसल्याने ‘एफटीआयआय’चे कामकाज नियामक मंडळ, सोसायटी आणि शैक्षणिक परिषद यांशिवायच सुरू होते. यामुळे संस्थेला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात मर्यादा येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून अनुप जलोटा हे ‘बिग बॉस १२’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतल्याने चर्चेत आहेत. या शोमध्ये त्यांनी आपल्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असलेली गर्लफ्रेंड जसलीन मथारू हिच्यासोबत प्रवेश केला. विशेष म्हणजे बिग बॉसच्या मंच्यावर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.