‘बिग बॉस’चं बारावं पर्व त्यातील जोड्यांमुळे चांगलंच चर्चेत आलं होतं. प्रेक्षकांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला होता जेव्हा यात ‘भजन सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा यांनी सहभाग घेतला. त्याहून धक्कादायक गोष्ट ही होती, की गायिका व मॉडेल जसलीन मथारुशी त्यांचं नाव जोडलं गेलं. या दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे. अनुप जलोटा व जसलीन मथुरा या जोडीने ‘बिग बॉस’ला चांगलीच टीआरपी मिळवून दिली. या दोघांचं नातं केवळं पब्लिसिटी स्टंट होता असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे दोघं लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता खुद्द अनुप जलोटा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “जसलीनशी मी लग्न करणार ही माझ्यासाठीसुद्धा नवीन बातमी आहे. खरंतर मी आणि तिचे बाबा मिळून तिच्यासाठी चांगला वर शोधत आहोत. कॅनडामध्ये राहणाऱ्या एका पंजाबी मुलाचं स्थळसुद्धा मी त्यांना सांगितलं होतं. मात्र अद्याप काही ठरलं नाही.”

आणखी वाचा : निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘हा’ खास फोटो

जसलीन माझी शिष्या असून माझ्यासाठी ती मुलीसमान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तिचं कन्यादानसुद्धा तेच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘बिग बॉस १२’च्या ग्रँड प्रिमिअरमध्ये जसलीन आणि अनुप जलोटा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. गेल्या साडेतीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. ‘मला भेटण्यासाठी अनुप कोलकाताला यायचे आणि आम्ही लपूनछपून एकमेकांना भेटायचो. पण आता बिग बॉसच्या घरात आम्हाला एकत्र मुक्तपणे वावरता येणार आहे,’ असं जसलीन म्हणाली होती. मात्र हे सर्व नाट्य फक्त शोपुरतं होतं.