अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांना भारतीय सिनेसृष्टीत ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्यांनी इंस्टाग्रामवर काही जुने फोटो शेअर केले असून एक भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली आहे.या फोटोंमध्ये त्यांच्या पहिल्या सिनेमातील व्यक्तिरेखेचा एक फोटो आहे.महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सारांश’ या चित्रपटातून अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, मदन जैन, निळू फुले यांच्याही भूमिका होत्या.

‘सारांश’ हा चित्रपट २५ मे १९८४ साली प्रकाशित झाला होता.या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३५ वर्ष झाली आहेत.अनुपम खेर यांनी जुना फोटो शेअर करत लिहिले आहे की, “३५ वर्षांपूर्वी सारांश प्रकाशित झाला होता. मी तेव्हा २८ वर्षांचा होतो. मी ६५ वर्षाच्या बी.वि.प्रधान यांची भूमिका साकारली होती.अभिनयाचा हा प्रवास खूप लांब आहे असं वाटतंय.पण, माझ्यासाठी ही सुरुवातच आहे.आतापर्यंत मला प्रेक्षकांनी जे प्रेम,आदर दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.असेच आशीर्वाद असू द्या.अजून मला लांबचा पल्ला गाठायचा आहे.”

अनुपम खेर यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,’राम लखन’,’खेल’, ‘डर’  अशा अनेक चित्रपटांची नावं यामध्ये आहेत. त्यांना पद्मश्री,पद्मभूषण पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. पी.टी.आयने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले की,”आपल्याला काम करताना नेहमीच उत्साहपूर्ण वाटले पाहिजे.जेव्हा मी सेटवर जातो, तेव्हा मी स्वतःला बजावतो की मला अभिनयाबद्दल काहीही माहिती नाहीये.जर आपण आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगला तर आपण कधीच नवीन गोष्टी शिकू शकणार नाही. पुढची ५० वर्ष तरी अभिनयातून निवृत्त होणार नाहीये.”