करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. करोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेते अनुपम खेर यांनी एका चारोळीच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. त्यांचा हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रहिमन वैक्सीन ढूंढिए, बिन वैक्सीन सब सून…
वैक्सीन बिन हीं बीत गए, एप्रिल मई और जून… 🙂

अशी संत कबिर यांच्या अंदाजात लिहिलेली चारोळी अनुपम खेर यांनी ट्विट केली आहे. लसी शिवाय तीन महिने गेले. मात्र अद्याप करोनावर मात करणारी लस सापडलेली नाही. लवकरात लवकर लस शोधून काढा. अन्यथा आपलं काही खरं नाही. असा या चारोळीचा अर्थ आहे. अनुपम खेर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

देशात २४ तासांत ४८,६६१ रुग्ण

देशभरात गेल्या चोवीस तासांत करोनाचे ४८ हजार ६६१ रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारांनजीक रुग्णवाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी ३६ हजार १४५ रुग्ण करोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाख ८५ हजार ५७६ झाली असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. चार लाख ६७,८८२ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये चार लाख ४२ हजार २६३ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन लाख ६२ हजार १५३ चाचण्या सरकारी, तर ७९,८७८ चाचण्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केल्या गेल्या. आतापर्यंत एक कोटी ६२ लाख ९१ हजार ३३१ चाचण्या झाल्या असून १० लाख लोकांमागे ११,८०५ चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे देण्यात आली.