१९८७ साली प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील ‘मोगॅम्बो’ हा साऱ्यांच्याच लक्षात असेल. जेवढी लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली. तितकंच या चित्रपटातील मोगॅम्बो हे पात्र प्रेक्षकांनी उचलून घेतलं. दमदार आवाज आणि डोळ्यात निखारा असा लूक असलेले हे पात्र अभिनेता अमरीश पुरी यांनी वठविलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका खऱ्या अर्थाने जिवंत झाली आणि त्यांच्या अभिनयातील एक वेगळी छाप प्रेक्षकांना पाहता आली. खरं तर या भूमिकेसाठी अमरीश पुरी ही दुसरी पसंती असून त्यांच्यापूर्वी या भूमिकेसाठी अन्य एका अभिनेत्याची निवड करण्यात आली होती.

मोगॅम्बो म्हटलं की डोळ्यासमोर पटकन अमरीश पुरी यांचा चेहरा येतो. किंबहुना त्यांच्यापेक्षा ही भूमिका अन्य कोणताही कलाकार साकारु शकत नाही असं वाटतं. परंतु या भूमिकेसाठी दिग्दर्शकांची पहिली पसंती अभिनेता अनुपम खेर यांना होती. अनुपम खेर यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली.

‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर आणि निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे. या चित्रपटातील मोगॅम्बो या भूमिकेसाठी त्यांनी पहिली पसंती अनुपम खेर यांना दिली होती. मात्र नंतर त्यांच्याऐवजी अमरीश पुरी यांना घेण्यात आलं.
चित्रपटातील मोगॅम्बो भूमिकेसाठी प्रथम मला विचारणा करण्यात आली होती. मात्र एक-दोन महिन्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी माझ्याऐवजी अमरीश पुरी यांची निवड केली, असं अनुपम खेर म्हणाले.

वाचा : दीपिकानं नाव बदललं; रणवीर सिंगऐवजी लावलं ‘या’ व्यक्तीचं नाव

दरम्यान, अनिल कपूरमुळे अमरीश पुरी यांना या चित्रपटात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अमरीश पुरी यांनी त्यांच्या करिअरमध्ये २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात हिंदी व्यतिरिक्त मराठी, कन्नड,पंजाबी, मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि इंग्रजी चित्रपटांचाही समावेश आहे.