अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. प्रशासक म्हणून अजेंडा सेट करण्याऐवजी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यावर जास्त भर देणार असल्याचे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. इतरही बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

‘माझ्या ४० वर्षांच्या अनुभवाचा या विद्यार्थ्यांसाठी उपयोग होईल याचा मला आनंद आहे. अनुभव इतरांना सांगितल्याने आपल्या दृष्टिकोनाचा विस्तार होतो आणि मला हेच करायचे आहे,’ असे ते म्हणाले.

शून्यापासून सुरुवात करणारे अनुपम खेर आपल्या या ४० वर्षांचा अनुभव सांगताना पुढे म्हणाले की, ‘मी एका सरकारी कारकूनाचा मुलगा आहे. मुंबईत आलो तेव्हा खिशात फक्त ४० रुपये होते. आज मला जो काही सन्मान मिळतोय, त्यामागे माझी कठोर मेहनत आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे. यापेक्षा अधिक मला काहीच नको. मी समाधानी आहे.’

वाचा : …अन् समंथाची ओळख बदलली

गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांना नवे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली होती. गजेंद्र चौहान यांची २०१५ मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांच्या विरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.