प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवायची सक्ती करायची की नाही, हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाच ठरवू दे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले. दिल्ली येथे ‘रुटस ऑफ कश्मीर’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हा निर्णय लोकांवर सोपवणे अधिक योग्य ठरेल, असे सांगितले.
देशात प्रादेशिक चित्रपट विशेषत: मराठी चित्रपट फार चांगली कामगिरी करत आहेत. फक्त बॉलीवूडचेच चित्रपटच भारताचे प्रतिनिधित्व करतात असे नाही. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांना काही प्रमाणात निश्चितच पाठबळ देण्याची गरज असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. राज्य सरकारने ७ एप्रिल रोजी मल्टिप्लेक्सधारकांना प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक राहील, या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर या निर्णयाविषयी चित्रपटक्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या सगळ्या घटनाक्रमानंतर राज्य सरकारने आपली अट शिथील करत ६ ते ९ या प्राईम टाईमऐवजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंतच्या वेळेत कधीही मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची मुभा मल्टिप्लेक्सधारकांना दिली होती.