करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या यादीत अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. दरम्यान अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. परिणामी त्यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे अनुपम खेर यांच्या आईला त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही.

अवश्य पाहा – विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. ते म्हणाले, “माझा भाऊ, वहिनी आणि पुतणी यांना देखील करोनाची लागण झाली. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरु आहेत. परिणामी ते झपाट्याने बरे होत आहेत. परंतु या वातावरणात मला आईची फार चिंता होतेय. कारण रुग्णालयात उपचार घेताना देखील ती शांत राहात नाही. ती सतत आमची चिंता करत असते. त्यामुळे आम्ही आईला तिला करोना झाल्याचं सांगितलेलं नाही. पण आसपासचं वातावरण पाहून कचादित तिला कळतंय की ती इथे का आली आहे.” अशा आशयाचं संभाषण अनुपम खेर यांनी आपल्या चाहत्यांसोबत केलं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांच काय झालं?; बॉलिवूड संगीतकाराचा केंद्र सरकारला सवाल

देशात २४ तासांत २८ हजार रुग्ण

देशात गेल्या २४ तासांमध्ये २८ हजार ७०१ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ झाली. देशात आतापर्यंत ५.५ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. १९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर २.६४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या २३ हजार १७४ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.