आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारे अभिनेते म्हणजे अनुपम खेर. २५ मे रोजी त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या दुनियेला ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. परंतु या ३५ वर्षांत कधीच त्यांच्याकडे चित्रपट नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली नव्हती. अनुपम यांच्याकडे भलेही काम नसले तरी ते स्वत:ला जगातील सशक्त अभिनेता मानतात.

‘गेल्या ३५ वर्षांमध्ये एकही दिवस, एकही तास असा नव्हता जेव्हा माझ्याकडे काम नव्हते. मी सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटामध्ये व्यग्र होतो. परंतु आता पहिल्यांदा असे झाले आहे की वन डे चित्रपटानंतर माझ्याकडे एकही चित्रपट नाही. तरीही मी स्वत:ला जगातील सर्वात सशक्त अभिनेता मानतो’ असे म्हणत अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली आहे.

त्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्याकडे एकही चित्रपट नाही असे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झाले आहे. २५ मे रोजी माझ्या अभिनयाच्या दुनियेला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ मे १९८४ रोजी माझा पहिला चित्रपट “सारांश” प्रदर्शित झाला होता. करिअरच्या या ३५ वर्षामध्ये खूप चढ-उतार पहायला मिळाले आणि आता पहिल्यांदा असे झाले आहे की माझ्याकडे चित्रपट नाही. जेवढे लोक चित्रपटाची निर्मीती करत आहेत त्यांनी माझ्याकडे या, मी सगळ्यांच्या चित्रपटात काम करु इच्छितो.’

अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट ‘वन डे’चे चित्रीकरण नुकताच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अनुपम यांच्यासह ईशा गुप्ता, कुमुद मिश्रा, झाकिर हुसेन, झरीना वहाब, मुरली शर्मा, अनंत महादेवन आणि राजेश शर्मा देखील दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक नंदा यांनी केले असून चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.