करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक नागरिक सध्या घरीच आहे. दररोज चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही कलाकार मंडळी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. त्यातच सध्या अभिनेता अनुपम खेर यांची एक पोस्ट तुफान व्हायरल होत असून या लॉकडाउनच्या काळात माझ्या डोक्यावर केस येतील का ?असा भन्नाट प्रश्न त्यांनी विचारला आहे.

देशात लॉकडाउन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सोडली तर सारीच दुकाने बंद आहेत. त्यामुळे या बंदच्या परिस्थिती घरात राहून नागरिकांना कोणत्या समस्या येतायेत हे अनुपम खेर यांनी मजेशीर अंदाजात सांगितलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनचा थेट संबंध त्यांच्या डोक्यावरील केसांशी जोडला आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट करत त्यांनी एक प्रश्न विचारला आहे.


‘मला एक गोष्ट जाणवतीये, ती म्हणजे होम क्वारंटाइन आणि लॉकडाउनच्या दरम्यान माझ्या डोक्यावरील केस परत येतील. जर माझे केस परत आले, तर मला कोणती हेअरस्टाइल शोभून दिसेल? तुम्हाला काय वाटतं? हसू नका. हा खरंच फार गंभीर विषय आहे. तसं सांगायचं झालं तर सगळ्याच स्टाइलमध्ये मी चांगला दिसतोय. पण तरीसुद्धा तुम्हाला काय सुचतं ते सांगा’, असं कॅप्शन अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.

पाहा : Photos : हॉटनेसच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींनाही मागे टाकते शरद केळकरची पत्नी

 दरम्यान, सध्या लॉकडाउन असल्यामुळे अनुपम खेरदेखील घरीच आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. तसंच सोशल मीडियावर सक्रीय असणारे अनुपम खेर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. बऱ्याचदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याचीही वेळ येते. मात्र या साऱ्याला ते बिनधास्त सामोरे जातात.