माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा निषेध केल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय कोलकात्तामध्ये आला असून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पडदा फाडल्याचं समोर आलं.कार्यकर्त्यांच्या या वर्तनामुळे येथील शो रद्द करण्यात आले असून या प्रकरणावर अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे.

संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या वादग्रस्त कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटाचं नाव हे अपमानास्पद असून या नावामुळे मनमोहन सिंग यांचा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा अपमान झाल्याचं मत काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं असून त्यांनी चित्रपटगृहात जाऊन पडदे फाडले. कार्यकर्त्यांचं हे वर्तन पाहिल्यानंतर अनुपम खेर यांनी तात्काळ ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवत ही असहिष्णुता असल्याचं म्हटलं आहे.

‘कोलकात्तामधील चित्रपटगृहात काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी जे कृत्य केले ते अत्यंत चुकीचं आहे.‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे शो रद्द व्हावेत यासाठी चित्रपटाचा पडदा फाडण्यात आला.ही असहिष्णुता आहे’, असं अनुपम खेर यांनी म्हटलं.

दरम्यान, चित्रपटाचं नाव हे अपमानास्पद आहे. या नावातून चित्रपट निर्मात्यांना नक्की काय सांगायचं आहे ? कोलकातामध्ये १०० कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहांबाहेर निषेध नोंदविला होता. जो योगच होता, असं बंगालच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष शादाब खान यांनी सांगितलं.